स्वच्छ सर्वेक्षणच्या गुणांकन पध्दतीत बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:08 AM2021-05-27T04:08:08+5:302021-05-27T04:08:08+5:30

नागपूर : यावर्षी स्वच्छ सर्वेक्षणच्या गुणांकन पध्दतीमध्ये बदल करण्यात आला आहे. आता चारऐवजी तीन निकषांच्या आधारावर गुणांकन केले जाणार ...

Changes in the scoring system of clean surveys | स्वच्छ सर्वेक्षणच्या गुणांकन पध्दतीत बदल

स्वच्छ सर्वेक्षणच्या गुणांकन पध्दतीत बदल

googlenewsNext

नागपूर : यावर्षी स्वच्छ सर्वेक्षणच्या गुणांकन पध्दतीमध्ये बदल करण्यात आला आहे. आता चारऐवजी तीन निकषांच्या आधारावर गुणांकन केले जाणार आहे. प्रत्येक निकषाकरिता वेगवेगळे गुण निश्चित करण्यात आले आहेत.

२०२० मध्ये नागरिकांची प्रतिक्रिया, थेट निरीक्षण, सेवास्तरीय प्रगती व प्रमाणीकरण याकरिता प्रत्येकी १५०० गुण दिले जात होते. यावर्षी नागरिकांचा आवाज या निकषामध्ये प्रतिक्रिया, प्रतिबध्दता, अनुभव, स्वच्छता अ‍ॅप व नावीण्यता यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यावर ३० टक्के म्हणजे, १८०० गुण ठेवण्यात आले आहेत. सेवास्तरीय प्रगतीमध्ये कचऱ्याची विभागणी, प्रक्रिया व विल्हेवाट आणि शाश्वत स्वच्छता या बाबींचा समावेश आहे. त्यावर ४० टक्के म्हणजे, २४०० गुण ठेवण्यात आले आहेत. प्रमाणीकरण या तिसऱ्या निकषावर ३० टक्के म्हणजे, १८०० गुण आहेत.

गेल्यावर्षी नागपूरने ६००० पैकी ४२८३ गुण मिळवून ४० वे स्थान पटकावले होते. नागपूरने कचरामुक्त शहराच्या निकषात गुण गमावले होते; पण घराघरांतून कचरा गोळा करण्याच्या कार्यक्रमाने ती उणीव भरून काढली होती. प्रमाणीकरण निकषामध्ये नागपूरला यावर्षीही फटका बसवण्याची शक्यता आहे. या निकषात नागपूरला किमान ५ रेटिंग मिळवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे.

ग्रीन व्हिजिल फाउंडेशनचे संस्थापक कौस्तव चॅटर्जी यांच्या मतानुसार, नागपूर महानगरपालिकेने उत्कृष्ट प्रयत्न केल्यानंतरही कचरा विभाजनात केवळ २०-२५ टक्के गुण मिळाले. आपण घराघरांतून कचरा गोळा करण्याच्या कार्यक्रमामुळे चांगली प्रगती करू शकतो; पण कचऱ्यावरील प्रक्रिया व विल्हेवाट आपल्याला पुन्हा मागे ओढेल. कचरा प्रक्रियेत चांगले गुण मिळवण्यासाठी आपल्याला कचऱ्यापासून वीजनिर्मिती केल्यास फायदा होऊ शकतो.

मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार यांनी यासंदर्भात बोलताना कचरा प्रक्रियेकरिता तीन नवीन प्रकल्प उभारले जाणार असल्याची व त्याचे टेंडर १५ दिवसांत जारी केले जाईल, अशी माहिती दिली. गेल्यावर्षीच्या उणिवा यावर्षी भरून काढून जास्तीत जास्त गुण मिळवण्याचा प्रयत्न आहे. नागपूर विकसनशील शहर आहे; पण कचरा विल्हेवाटीसाठी प्रभावी यंत्रणा उभी केल्याशिवाय आपण स्वत:ला पंचतारांकित शहर म्हणू शकणार नाही, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

Web Title: Changes in the scoring system of clean surveys

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.