भारताची राज्यघटना बदलणे म्हणजे देशद्रोह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 02:14 AM2017-10-01T02:14:10+5:302017-10-01T02:14:20+5:30
भारताची राज्यघटना कुणीही बदलू शकत नाही. तसा विचार करणे म्हणजे देशद्रोह ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केले.
नागपूर : भारताची राज्यघटना कुणीही बदलू शकत नाही. तसा विचार करणे म्हणजे देशद्रोह ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केले. ६१व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर आयोजित मुख्य सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमी नागपूरच्यावतीने ६१व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष भदन्त आर्य नागार्जून सुरेई ससाई होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, महापौर नंदा जिचकार आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे खºया अर्थाने राष्ट्रनिर्माते होते त्यांच्या योगदानाला कुणीही विसरू शकत नाही. भारताला आज जगात बलशाली म्हणून पाहिले जात असेल तर ते केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेमुळेच. राज्यघटनेने सर्वांना समान अधिकार दिले आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यघटनेत बदल करण्याचा कोणी विचार करीत असेल किंवा कोणी आरक्षण हटविण्याची भाषा करीत असेल तर त्यांच्या विरोधात मी झेंडा घेऊन उभा असेन, असे रामदास आठवले म्हणाले.
आरक्षणाला धक्का लागणार नाही - गडकरी
आरक्षण हटविण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. भविष्यात कोणाला यासाठी झेंडा घेऊन उभे होण्याची गरजही पडणार नाही, हा विश्वास ठेवा. कारण, आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांप्रती कटीबद्ध आहोत. समता, बंधुत्त्व आणि न्याय याच अधारे देशाचे निर्माण व्हावे यासाठी पंतप्रधानांसह आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत, असे नितीन कडकरी म्हणाले.
धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी जात असताना खासगी बस-जीप अपघातात चार ठार
वर्धा : देवळी मार्गावरील देलसुरा गावाजवळ शुक्रवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास खासगी बसने जीपला दिलेल्या धडकेत चार जणांचा जागीच मृत्यू तर अन्य सात जण जखमी झाले. हे सर्व जण नांदेडहून नागपूरच्या दीक्षाभूमीवर जात होते.
अरविंद खंदारे (३३), दिलीप खंदारे (३५), शिवाजी ढगे (३८) आणि विठ्ठलराव खडसे (४२) अशी मृतांची नावे आहेत. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त या चौघांसह नांदेडहून ११ जण जीपने नागपूरकडे जात होते. वर्धा जिल्ह्यातील देलसुरा गावानजीक ओव्हरटेकच्या प्रयत्नात असलेल्या भरधाव बसने त्यांच्या जीपला धडक दिली. या अपघातातील जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.