संविधान बदलणे म्हणजे देशद्रोह - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2017 10:05 PM2017-09-30T22:05:37+5:302017-09-30T22:05:59+5:30
भारताचे संविधान हे कुणीही बदलू शकत नाही. तसा विचार करणे म्हणजे देशद्रोह ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (30 सप्टेंबर ) येथे केले.
नागपूर - भारताचे संविधान हे कुणीही बदलू शकत नाही. तसा विचार करणे म्हणजे देशद्रोह ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (30 सप्टेंबर ) येथे केले. ६१ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर आयोजित मुख्य सोहळ्यात ते बोलत होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमी नागपूरच्यावतीने शनिवारी ६१ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे उर्जा व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, महापौर नंदा जिचकार आदी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ख-या अर्थाने राष्ट्रनिर्माते होते त्यांच्या योगदानाला कुणीही विसरू शकत नाही. भारताला आज जगात बलशाली म्हणून पाहिले जात असेल तर ते केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळेच. संविधानाने सर्वांना समान अधिकार दिले आहेत, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधानात बदल करण्याचा कोणी विचार करीत असेल किंवा कोणी आरक्षण हटविण्याची भाषेचा वापर करीत असेल तर त्यांच्या विरोधात मी झेंडा घेवून उभा असेल.
भदन्त आर्य नागार्जून सुरेई ससाई, महापौर नंदा जिचकार यांनीही यावेळी विचार मांडले.
दीक्षाभूमीवर निळा महासागर
61 वा धम्मचक्र प्रवर्तन सोहळा नागपुरातील दीक्षाभूमी येथे शनिवारी आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यासाठी देश-विदेशातून लाखो आंबेडकरी अनुयायी पवित्र दीक्षाभूमीवर दाखल झाले होते. जगाला समतेचा संदेश देणा:या या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग, जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागाजरुन सुरेई ससाई सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी होते.