बदलती पीक पद्धत तणमोरांच्या जीवावर; देशात केवळ २६४ पक्षी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 11:23 AM2021-08-12T11:23:37+5:302021-08-12T11:24:03+5:30

Nagpur News गवताळ भागात राहून कीटकांवर उपजीविका करणारा तणमोर पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर असून, तो संकटग्रस्त प्रजातीमध्ये गणला जात आहे.

Changing cropping pattern is problematic for Lesser Florican; Only 264 birds in the country | बदलती पीक पद्धत तणमोरांच्या जीवावर; देशात केवळ २६४ पक्षी

बदलती पीक पद्धत तणमोरांच्या जीवावर; देशात केवळ २६४ पक्षी

googlenewsNext
ठळक मुद्देपूर्व विदर्भातील भातशेती ठरू शकते संवर्धक

गोपालकृष्ण मांडवकर

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : गवताळ भागात राहून कीटकांवर उपजीविका करणारा तणमोर पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर असून, तो संकटग्रस्त प्रजातीमध्ये गणला जात आहे. बदलती पीक पद्धती आणि शिकारीमुळे त्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे. सध्या देशभरात फक्त २६४ तणमोर उरल्याची नोंद आहे.

धोकाग्रस्त श्रेणीतील तणमोर पक्ष्याची संख्या झपाट्याने घटत आहे. अलीकडेच ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये लावलेल्या एका कॅमेरा ट्रॅपमध्ये तणमोराची मादी आढळून आली. यामुळे या अभयारण्यात तणमोराचे वास्तव्य असल्याला आधार मिळाला आहे. किमान दोन वर्षे शोध घेऊन अभ्यास केल्यावरच त्याचे अस्तित्व किती, हे सिद्ध होऊ शकणार आहे. नागपुरात सुमारे तीन वर्षांपूर्वी सदरमधील व्हीसीएच्या मैदानावर एक जखमी तणमोर आढळला होता. ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. त्याचाही अभ्यास होऊ शकला नाही.

महाराष्ट्रात याच्या फार कमी नोंदी आहेत. मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान व आंध्र प्रदेशात तो अधिक आढळतो. भारतीय वन्यजीव संस्थेने २०१८ मध्ये केलेल्या अभ्यासात सुमारे २६४ तणमोर पक्षी दिसून आले. राज्यात त्यांचा आकडा चिंताजनक आहे.

अध्ययनच नाही, अडथळे अधिक

तणमोराचे म्हणावे तसे अध्ययनच झालेले नाही. त्यात बरेच अडथळे आहेत. राजस्थानमधील सोंडोपल्ली या गवताळ प्रदेशात तणमोराच्या अध्ययनासाठी एका मादीला कॉलर आयडी लावून काही वर्षांपूर्वी डॉ. बिलाल हबीब यांनी अभ्यासाचा प्रयत्न केला होता. मात्र ती मादी काही अंतर फिरून पुन्हा एकाच ठिकाणी परत येत असल्याने प्रयत्न निष्फळ ठरले. १९८३ मध्ये मध्य प्रदेशातील सैलाना खरमोर अभयारण्य तणमोराच्या संवर्धनासाठी निर्माण करण्यात आले होते. आता ते अभयारण्यच समस्याग्रस्त झाले आहे.

असा असतो तणमोर

पूर्ण वाढ झालेला तणमोर पक्षी फक्त ५१० ते ७४० ग्रॅम वजनाएवढा असतो. नराची लांबी ४५ सेंटीमीटर असून, मादीची ५० सेंटीमीटर असते. प्रजनन काळात मादीला आकृष्ट करण्यासाठी तो पंखांचा आवाज करीत सुमारे पाच फूट उंचापर्यंत उंच उडी घेतो. सहसा हे पक्षी दिसतच नाही. त्यांच्या उडीवरूनच त्यांचे ठिकाण शोधून शिकार केली जाते.

माळरान व पीक पद्धतीमधील बदल घातक

माळरानातील बदल आणि बदललेली पीक पद्धती तणमोरासह अनेक पक्ष्यांसाठी घातक ठरल्याचे मत नागपुरातील पक्षी अभ्यासक तथा सृष्टी पर्यावरण मंडळाचे सचिव विनीत अरोरा यांनी व्यक्त केले आहे. इंग्रज काळात अनेक कुरणांचे रूपांतर कापसाच्या शेतात झाले. रसायनाचा वापर वाढला. पारंपरिक शेतीत पिकांचे वैविध्य होते. पीक पद्धतीत बदल झाल्याने माळरान आणि शेतावर जगणारे अनेक पक्षी संकटात आले व नामशेष झाले. धानाची शेतीही मोडित निघून त्यात अन्य पीक घेणे सुरू झाले. यामुळे पूर्व विदर्भातील धानशेतीमध्ये वाढू पाहणारी तणमोराची संख्या घटली आहे.

जमीन वनविभागाने कुरण विकासासाठी राखीव ठेवलेल्या जमिनीवर कुरण विकासाचे काम केल्यास तणमोराचे संरक्षण होईल, असे मत फाऊंडेशन फॉर इकॉनॉमिक ॲण्ड इकॉलॉजिकल डेव्हलपमेंट संस्थेचे संचालक कौस्तुभ पांढरीपांडे यांनीही व्यक्त केले आहे.

...

Web Title: Changing cropping pattern is problematic forLesser Florican; Only 264 birds in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.