वीज मीटरमध्ये फेरफार केल्यास घरात होऊ शकतो कायमचा अंधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:10 AM2021-08-26T04:10:34+5:302021-08-26T04:10:34+5:30
प्रत्येक वीज कनेक्शनवर आहे महावितरणची नजर : ३० मीटरपर्यंत वापर होणारे मीटर विशेष रडारवर लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ...
प्रत्येक वीज कनेक्शनवर आहे महावितरणची नजर :
३० मीटरपर्यंत वापर होणारे मीटर विशेष रडारवर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मीटरमध्ये फेरफार करून बिल बचत करण्याचा सल्ला कुणी दिला असेल तर सावध व्हा. वीज मीटरमध्ये फेरफार किंवा छेडखानी केली तर त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते. इतकेच नव्हे तर तुमच्या घरात कायमचा अंधार होऊ शकतो. यासोबतच भरभक्कम दंडही भरावा लागेल.
अनेक लोक थेट वीज तारांवर हूक घालून चोरी करतात. सध्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मीटरमध्ये फेरफार करून बिल कमी करण्याचे प्रकार वाढले आहेत. मॅग्नेट व चीप लावून मीटरची गती कमी करण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. यामुळे विजेच्या हानीचे प्रकार वाढले. परिणामी महावितरणने आता थकबाकी वसुली मोहिमेसोबतच वीजचोरी व मीटरमध्ये फेरफार करणाऱ्यांना पकडण्यावर भर दिला आहे. केवळ ३० युनिटपर्यंत वापर होणारे मीटर महावितरणच्या रडारवर आहेत. असे कनेक्शन निश्चित करून त्यांची तपासणी केली जात आहे. मीटरच्या गतीचाही आढावा घेतला जात आहे. किंचितही संशय आल्यास महावितरणचे पथक मीटरच्या तपासणीसाठी घरी पोहोचतील. आता एमआरआय मीटर लागत आहेत. ते मीटरच्या गतीमध्ये काही गडबड असेल तर लगेच पकडण्यास सक्षम आहेत. व्यावसायिक व वाणिज्यिक कनेक्शनलाही विशेष मीटर दिले जात आहेत. त्यामुळे मीटरमध्ये फेरफार होऊ शकणार नाही.
- कोट
- महावितरणची नजर आता प्रत्येक मीटरवर आहे. त्यात फेरफार केला तर लगेच पकडले जातील. एमआरआय व एएमआरसारख्या तंत्राने हे शक्य होईल. मीटरमध्ये फेरफार केल्यास मीटर जप्त केला जाईल. भरभक्कम दंडही ठोठावला जाईल. इलेक्ट्रीसिटी ॲक्टअंतर्गत गुन्हासुद्धा दाखल होतो. यात शिक्षेचीही तरतूद आहे.
दिलीप दोडके, मुख्य अभियंता, महावितरण