नागपूरच्या सोनेगाव तलावाचा बदलतोय चेहरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 10:11 PM2019-04-29T22:11:51+5:302019-04-29T22:15:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपुरातील ऐतिहासिक तलावाचा वारसा यामध्ये सोनेगाव तलावाचाही समावेश आहे. भोसले काळात बांधलेल्या या तलावाचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरातील ऐतिहासिक तलावाचा वारसा यामध्ये सोनेगाव तलावाचाही समावेश आहे. भोसले काळात बांधलेल्या या तलावाचे क्षेत्र ४० हेक्टरवर होते. मात्र लोकवस्ती वाढल्याने तलावाच्या जागेवर ले-आऊट पाडून तलावाचे क्षेत्रफळ आता १६.५९ हेक्टरवर आले आहे. प्रशासनाने २०१७ मध्ये तलावाच्या विकासासाठी प्रयत्न सुरू केले. त्याचाच परिपाक म्हणून शहरातील इतर तलावाच्या तुलनेत सोनेगावचा चेहरा आता बदलतो आहे. तलावाच्या संरक्षणासाठी स्थानिक लोकांचे पाठबळ मिळत आहे.
तलावाचा इतिहास
सोनेगाव तलाव सुमारे २५० वर्षांपूर्वी नागपूरच्या भोसले घराण्याच्या शासनकाळात भोसल्यांनी बांधला. सोनेगाव शिवारात असल्यामुळे याचे नाव सोनेगाव पडले. पूर्वी हा एक विस्तीर्ण तलाव होता. तलावाचा दगडी बांध अद्यापही मजबूत आहे. या तलावाचा वापर भोसले घराण्यातील लोक सहलीसाठी करीत व ८-१० दिवस येथे येऊन राहत. शेजारी बांधण्यात आलेल्या विहिरीत हत्ती-घोडे आत जाऊन पाणी पिऊ शकत. जवळच भोसल्यांनी पोहण्याचे टाके बांधले होते. या टाक्यात तलावातून पाणी सोडण्यात येत असे. त्याची पाईपलाईन सध्याही अस्तित्वात आहे. तलावाच्या काठावर गणपती आणि हनुमानाचे मंदिर आहे.
तलावाची सद्यस्थिती
प्रशासनाने तलावाच्या संवर्धनासाठी पुढाकार घेतल्याने तलावाचे अस्तित्व अबाधित आहे. तलावात विसर्जनावर बंदी घातल्यामुळे तलावाच्या पाण्यात कचरा दिसून येत नाही. तलावाच्या पूर्वेकडील भागात संरक्षण भिंत बांधण्यात आली आहे. तलावाच्या काठावर जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात आला आहे. तलाव परिसरात हिरवळ राहावी म्हणून वृक्षारोपण केले आहे. तलावाचे सौंदर्य न्याहाळण्यासाठी बाके लावण्यात आली आहेत. मंदिराच्या परिसरात बसण्याची व्यवस्थाा केली आहे. तलाव परिसराची स्वच्छता नियमित होत आहे. सोनेगाव तलाव हा वरच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे तलावाचा जलस्तर कमी आहे. प्रशासनाने जलस्तर वाढविण्यासाठी विशेष उपाय केलेले नाही. त्यामुळे सध्या तलावाचा अर्धा भाग कोरडा पडला आहे.
तलावाला खासगी मालकीतून मुक्त करण्याचा प्रयत्न
नागपूर शहराच्या मंजूर विकास योजनेत सोनेगाव तलाव जलाशय म्हणून शासनाकडे नामनिर्देशित आहे. १५ ऑक्टोबर २००३ नुसार सोनेगाव तलाव हेरिटेज स्थळ म्हणून समाविष्ट आहे. या तलावाचे नगर भूमापन विभागाच्या मोजणीनुसार नकाशाप्रमाणे एकूण क्षेत्र १६.५९ हेक्टर असून त्यावर खासगी मालकी होती. या जागेची सार्वजनिक प्रयोजनार्थ आवश्यकता असल्याने व ही जागा संपादित करण्याचा मनपाचा मानस असल्याने सोनेगाव तलावाची संपूर्ण जागा संवैधानिक कार्यवाही करून महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ अंतर्गत आरक्षण विकास योजनेत समाविष्ट करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता.
तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी झाले प्रयत्न
तलावाकडे दुर्लक्ष झाल्याने तलावात गाळ व माती साचली होती. तलावाला गतवैभव प्राप्त करून देण्याचा संकल्प प्रशासनाने केला होता. पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याचा प्रशासनाचा मानस होता. तलावात पाण्याची पातळी वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. तलावातील सुप्त जलस्रोत पुनरुज्जीवित करण्यात येणार होते. तलावातील लुप्त झालेल्या झऱ्यांचा शोध घेण्यात येणार होता. म्युझिकल कारंजे निर्माण होणार होते. दोन बाजूंना उद्यान, तलावाच्या परिसरात दिवे लावणे, जॉगिंग ट्रॅक, तलाव परिसरात वृक्षारोपण, परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात येणार होते. ही संपूर्ण मोहीम भूजल सर्वेक्षण विभागाचे माजी सहसंचालक चेतन गजभिये यांच्या नेतृत्वात संपन्न होणार होती. यासाठी सात कोटी रुपये शासन व स्थानिक प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणार होते. यातील काही प्रयत्न झाल्याचे दिसून येते.
हे प्रयत्न झाले नाही
तलावात म्युझिकल कारंजे बसले नाही. दोन्ही बाजूंना उद्यान विकसित झाले नाही. तलावाच्या सभोवताली पथदिवे लागले नाही. नाला बंडिग झाले नाही. पोहना नदी व परिसरातील नाले वळविण्यात आले नाही. सध्याची तलावातील पाण्याची स्थिती लक्षात घेता रिचार्ज शॉप मारलेले दिसत नाही.
हे प्रयत्न झाले
गाळ व माती काढण्यात आली. काही प्रमाणात लिकेजचीही दुरुस्ती झाली. वॉकिंग ट्रॅक झाला. विसर्जनाचा कचरा कमी झाला. वृक्षारोपण व सौंदर्यीकरणासाठी प्रयत्न झाले.