सीमकार्ड बदलवून उडविले ४२ लाख : सायबर गुन्हेगारांनी केले ऑनलाईन पैसे ट्रान्सफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 10:20 PM2019-10-02T22:20:49+5:302019-10-02T22:22:21+5:30

सीमकार्ड बदलवून सायबर गुन्हेगारांनी महिला व्यावसायिकाचे ४१.५० लाख रुपये उडविल्याची घटना धंतोली पोलीस ठाण्यांतर्गत घडली आहे.

By changing Simcard cheated Rs 42 lakh: Cyber criminals did online money transfer | सीमकार्ड बदलवून उडविले ४२ लाख : सायबर गुन्हेगारांनी केले ऑनलाईन पैसे ट्रान्सफर

सीमकार्ड बदलवून उडविले ४२ लाख : सायबर गुन्हेगारांनी केले ऑनलाईन पैसे ट्रान्सफर

Next
ठळक मुद्देमहिला व्यावसायिकाची फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सीमकार्ड बदलवून सायबर गुन्हेगारांनी महिला व्यावसायिकाचे ४१.५० लाख रुपये उडविल्याची घटना धंतोली पोलीस ठाण्यांतर्गत घडली आहे. अशा प्रकारच्या सायबर गुन्ह्यापासून यापूर्वी शहरातील उद्योजकांनाही फटका बसला आहे.
रामदासपेठेतील रहिवासी अवंती अभिराम देशमुख अजनीच्या अजित बेकरीत संचालक आहेत. बेकरीत आणखी काही लोक संचालक आहे. अजित बेकरी आणि मेसर्स ए. आर. फूडचे धंतोलीतील सारस्वत बँकेत खाते आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या खात्यात अवंती आणि इतर संचालक व्यवहार करतात. या खात्यातून कोणत्याही प्रकारचे ऑनलाईन व्यवहार केल्यास त्याचे मॅसेज अवंती यांना मोबाईलवर येतात. हे सीमकार्ड अवंती यांचे पती अभिराम देशमुख यांच्या नावावर आहे. सायबर गुन्हेगारांनी अभिराम देशमुख यांच्या नावाने बनावट कागदपत्र सादर करून बीएसएनएलमध्ये सीमकार्ड हरविल्याचा अर्ज केला. त्यांच्या अर्जानुसार बीएसएनएलने २८ सप्टेबरला वापरात असलेले सीमकार्ड बंद केले. त्यामुळे अवंती यांना मॅसेज येणे बंद झाले. बीएसएनएलने बनावट कागदपत्रांच्या आधारे नवे सीमकार्ड जारी केले. त्यानंतर सायबर गुन्हेगारांनी अजित बेकरी आणि ए. आर. फर्मच्या खात्यातून रक्कम काढली. २८ सप्टेबरच्या दुपारी ४.३० ते ३० सप्टेबरला सकाळी १० वाजेपर्यंत दोन्ही खात्यातून वेगवेगळ्या वेळात ४१ लाख ५० हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले. ही रक्कम जाफर खान, समीर सिंह, डीजी एन्टरप्रायजेसच्या डेव्हलपमेंट, वंदना देवी यांच्या आयसीआयसीआय बँकेचे खाते आणि इंडिया फर्स्ट ट्रेडिंगच्या आयसीआयसीआय बँकेच्या खात्यात जमा झाले. सीमकार्ड बंद असल्यामुळे अवंती यांना याची माहिती झाली नाही. ३० सप्टेबरला बँकेच्या कर्मचाऱ्याने अवंती यांना या व्यवहाराची माहिती दिली. त्या त्वरित बँकेत गेल्या असता त्यांना ऑनलाईन पैसे ट्रान्सफर झाल्याचे समजले. पैसे जमा झालेल्या फर्मसोबत काहीच संबंध नसल्याचे सांगून सीमकार्ड बंद असल्यामुळे हे घडल्याचे लक्षात आले. त्यांनी धंतोली पोलिसात गुन्हा दाखल केला. ठाणेदार विजय आकोत यांनी बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांची चौकशी केली असता बनावट कागदपत्राच्या आधारे सीमकार्ड घेण्यातआल्याचे समजले. सायबर गुन्हेगारांनी दिल्ली आणि दुसऱ्या राज्यातून हा गुन्हा घडविला असून त्यांना अभिराम देशमुख आणि बँक खात्याची माहिती कशी मिळाली हा प्रश्न आहे. बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी चौकशी न करता सीमकार्ड कसे दिले हा प्रश्न आहे. यासंदर्भात धंतोली पोलीस पुण्याला जाणार आहेत.
४२ तासात केले पैसे ट्रान्सफर
सायबर गुन्हेगारांनी शनिवारी दुपारी ४.३० ते सोमवारी सकाळी १० वाजेपर्यंत ४२ तासात पैसे ट्रान्सफर केले आहेत. सुटीचा दिवस असल्यामुळे ग्राहक मोबाईल कंपनीशी संपर्क साधत नाहीत. मॅसेज न आल्यामुळे पैसे ट्रान्सफर झाल्याची माहिती मिळाली नाही. सोमवारी बँक उघडल्यानंतर पैसे ट्रान्सफर झाल्याचे समजले. पोलीस ज्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाले त्या आधारे आरोपींचा तपास करीत आहेत. या प्रकारे फसवणूक झाल्याच्या यापूर्वी पाच घटना घडल्या आहेत. एका व्यापाऱ्याचे असे लाखो रुपये सारस्वत बँकेतून उडविल्यामुळे पोलिसांना बँकेतील कर्मचाऱ्यांवर संशय आहे. सायबर गुन्हेगार नेहमी वेगवेगळ्या शक्कल लढवून फसवणूक करीत असून सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी पोलिसांची विशेष शाखा आहे. तरीसुद्धा अशा घटना घडत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: By changing Simcard cheated Rs 42 lakh: Cyber criminals did online money transfer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.