अन् सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये निघाला कोब्रा, एकच खळबळ
By सुमेध वाघमार | Published: July 6, 2023 02:49 PM2023-07-06T14:49:33+5:302023-07-06T14:52:16+5:30
वेळीच केले रेस्क्यू : सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास टाकला
नागपूर : मेडिकलशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सकाळच्यावेळी लांबच लांब कोब्रा विषारी साप आढळून आल्याने खळबळ उडाली. रुग्णालय प्रशासनाने तातडीने सर्पमित्राला बोलविले. वॉर्डाकडे जाण्यापूर्वीच त्याने सापाला पकडल्याने सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास टाकला.
मेडिकल व सुपर स्पेशालिटीचा हॉस्पिटलचा मोठा परिसर झाडे-झुडपाने वेढला आहे. या परिसरात नेहमीच साप दिसून येतात. प्राप्त माहितीनुसार, सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास ‘सुपर’च्या तळमजल्यावर असलेल्या रक्तपेढी विभागातून कोब्रा जातीचा विषारी साप बाहेर येऊन वॉर्डाकडे जात होता. एका कर्मचाऱ्याची त्याच्यावर नजर पडताच त्याने तातडीने सर्पमित्र व वाईल्ड लाईफ वेलफेअर सोसायटीचे सचिव नितीश भांदकर याला फोन करून बोलावून घेतले. नितीशने मोठ्या शिताफीने कोब्राला पकडले.
नितीश यांच्यानुसार या सापाला त्याने लोकवस्तीच्या बाहेर सोडले. ‘लोकमत’शी बोलताना नितीश म्हणाला, या पूर्वी २६ जून रोजी मेडिकलच्या सिटी स्कॅन विभागात साप निघाला होता. या परिसरात साप निघाल्याच्या घटना नवीन नाहीत. परंतु झाडी-झुडपात जाताना काळजी घ्यावी.