नागपुरात सायबर गुन्हेगारांचा हैदोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 11:31 PM2020-08-01T23:31:02+5:302020-08-01T23:32:14+5:30

सायबर गुन्हेगारांनी एमआयडीसी, गिट्टीखदान आणि सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेगवेगळ्या व्यक्तींची फसवणूक करून त्यांची रक्कम लंपास केली.

Chaos of cyber criminals in Nagpur | नागपुरात सायबर गुन्हेगारांचा हैदोस

नागपुरात सायबर गुन्हेगारांचा हैदोस

Next
ठळक मुद्देऑनलाईन रक्कम लंपास : गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सायबर गुन्हेगारांनी एमआयडीसी, गिट्टीखदान आणि सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेगवेगळ्या व्यक्तींची फसवणूक करून त्यांची रक्कम लंपास केली.
एमआयडीसीतील फिर्यादी अभिषेक रामनाथ त्रिपाठी यांनी त्यांची जुनी वॉशिंग मशीन, अलमारी आणि अ‍ॅक्टिव्हा विकायची आहे म्हणून ओएलएक्सवर जाहिरात टाकली. ती पाहून आरोपी अरुण ब्रह्मदास राणा आणि जोरा सिंग या दोघांनी संपर्क करून त्या साहित्याचा त्रिपाठी यांच्यासोबत सौदा केला. तुमच्या खात्यात सामानाची रक्कम पाठवतो, असे सांगून त्रिपाठी यांच्याकडून त्याच्या बँक खात्याची माहिती घेतली आणि क्यूआर कोड पाठवून त्यांच्या खात्यातून ३२ हजार रुपये काढले. त्याचप्रमाणे त्रिपाठी यांचा मित्र तामसिंह लांजेवर त्याच्या खात्यातून ३५ हजार रुपये तर नरेंद्र उपाध्यायांच्या खात्यातून ४२ हजार ७०० रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करून घेतले. २० मे ते १६ जून या दरम्यान घडलेल्या या फसवणुकीच्या घटनेची तक्रार मिळाल्यानंतर शुक्रवारी रात्री एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.
गिट्टीखदान मधील अब्दुल अन्सारी यांना ओएलएक्सवर एक आर्टिका कार दिसली. ती विकत घेण्यासाठी त्यांनी भरत जयंतीलाल परमार (रा. कांदिवली, नवी मुंबई) याच्या मोबाईलवर संपर्क केला. आरोपीने कारचा सौदा दोन लाख रुपयात केला. त्यानंतर दोन लाखाच्या कारचे त्यांनी आरोपी परमारच्या खात्यात ४ लाख, २५ हजार रुपये जमा केले. मात्र आरोपी प्रत्येक वेळेस वेगळे कारण सांगून कार न देता रक्कम उकळू लागला. १३ जुलै ते १५ जुलै दरम्यान हा प्रकार घडला. आपली फसगत झाल्याचे लक्षात आल्यामुळे अन्सारी यांनी शुक्रवारी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.
तिसरी फसवणुकीची घटना सक्करदरात घडली. ४३ वर्षीय व्यक्तीच्या आयसीआयसीआय बँक खात्याची माहिती चोरून आरोपींनी त्यांच्या खात्यातून एकूण ५६ वेळा व्यवहार करून तीन लाख ४७ हजार रुपयांची ऑनलाईन खरेदी केली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडित दाम्पत्याने आरोपीसोबत संपर्क साधला. तेव्हा त्याने पीडित व्यक्तीच्या खात्यात ८० हजार ९०० रुपये वळते केले. मात्र उर्वरित रक्कम गिळंकृत केली. १० एप्रिल ते १ जूनच्या दरम्यान हा प्रकार घडला. पीडित दाम्पत्याने सक्करदरा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली. पोलिसांनी या प्रकरणी शुक्रवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.

Web Title: Chaos of cyber criminals in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.