मजुराच्या संशयास्पद मृत्यूमुळे हंगामा : मृतदेह घेऊन लकडगंज ठाण्यास घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 12:05 AM2020-02-27T00:05:44+5:302020-02-27T00:08:37+5:30
: तयार होत असलेल्या इमारतीत मजुराचा मृत्यू झाल्यामुळे लकडगंज ठाण्याच्या परिसरात तणाव निर्माण झाला. मजुराच्या मृत्यूमुळे संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी पोलिसांवर बिल्डर आणि ठेकेदाराला वाचविण्याचा आरोप केला. त्यांनी मृतदेह घेऊन लकडगंज ठाण्याला घेराव घातला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तयार होत असलेल्या इमारतीत मजुराचा मृत्यू झाल्यामुळे लकडगंज ठाण्याच्या परिसरात तणाव निर्माण झाला. मजुराच्या मृत्यूमुळे संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी पोलिसांवर बिल्डर आणि ठेकेदाराला वाचविण्याचा आरोप केला. त्यांनी मृतदेह घेऊन लकडगंज ठाण्याला घेराव घातला. बुधवारी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला.
धाकचंद सेवकराम बिसेन (२८) रा. नंदपुरा, आमगाव, गोंदिया असे मृत मजुराचे नाव आहे. बगडगंजच्या स्मॉल फॅक्टरी एरियात माधव कन्स्ट्रक्शनचे काम सुरू आहे. मंगळवारी सायंकाळी ५ वाजता धाकचंदची संशयास्पद अवस्थेत तब्येत बिघडली. साथीदारांनी त्यास मेडिकलला पोहोचविले. तेथे त्यास मृत घोषित करण्यात आले. धाकचंदच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीय आणि साथीदारांना दु:ख झाले. धाकचंद इमारतीच्या पहिल्या माळ््यावर काम करीत होता. दरम्यान, तो पडला. या घटनेची माहिती मिळताच लकडगंज पोलीस घटनास्थळी पोहोचले. धाकचंदच्या साथीदारांनी पोलिसांना माहिती देऊन ठेकेदार आणि बिल्डरविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. लकडगंज पोलिसांनी कारवाई करण्याऐवजी मजुरांना शवविच्छेदनाचा अहवाल येईपर्यंत संयम ठेवण्यास सांगितले. पोलिसांच्या भूमिकेमुळे धाकचंदच्या साथीदारांमध्ये संशय निर्माण झाला. त्यांना ठेकेदार आणि बिल्डर प्रभावशाली व्यक्तींच्या माध्यमातून लकडगंज पोलिसांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली. आज दुपारी शवविच्छेदन झाल्यानंतर धाकचंदचे साथीदार आणि त्याचे कुटुंबीय मृतदेह घेऊन लकडगंज ठाण्यात पोहोचले. त्यांनी मृतदेह ठाण्यासमोर ठेवून निदर्शने केली. त्यांनी ठाण्याला घेराव घालून ठेकेदार आणि बिल्डरविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. कुटुंबीयांच्या मते, घटनेनंतर पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. धाकचंद इमारतीवरून पडल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. परंतु त्याच्या मृत्यूसाठी ठेकेदार आणि बिल्डर दोषी आहेत. पोलिसांनी अकस्मात मृत्यूच्या प्रकरणात धाकचंदची अचानक प्रकृती बिघडल्याचे सांगितले. ही बाब खोटी आहे. घटनेच्या काही वेळापूर्वी धाकचंद काम करीत होता. अचानक घडलेल्या या घटनेमुळे लकडगंज ठाण्यात खळबळ उडाली. लकडगंज पोलिसांनी तपासानंतर योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले. पाऊण तासानंतर ठाण्यासमोर निदर्शने केल्यावर धाकचंदचे कुटुंबीय आणि साथीदार रवाना झाले. लकडगंज पोलिसांच्या मते डॉक्टरांनी धाकचंद नशेत शिडीवरून पडल्याचे सांगितले.