नागपुरात समाजकंटकांचा हैदोस, वाहनांची जाळपोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2020 10:47 PM2020-10-29T22:47:50+5:302020-10-29T22:49:18+5:30
Chaos of social nuisances, vehicles burnt, Crime news Nagpur नरेंद्रनगर, मनीषनगरमध्ये समाजकंटकांनी गुरुवारी पहाटे अक्षरशः हैदोस घातला. एक कार पेटवून दिली. तर १० ते १५ वाहनांच्या दगडाने काचा फोडल्या. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नरेंद्रनगर, मनीषनगरमध्ये समाजकंटकांनी गुरुवारी पहाटे अक्षरशः हैदोस घातला. एक कार पेटवून दिली. तर १० ते १५ वाहनांच्या दगडाने काचा फोडल्या. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले.
गुरुवारी पहाटे ३.४५ वाजताच्या सुमारास तीन समाजकंटक नरेंद्रनगर, शिल्पा सोसायटी, मनीषनगर परिसरात आले. त्यांनी आधी समीर राऊत यांच्या फोर्ड फिगो कारमधून पेट्रोल काढले आणि कारवर ओतून आग लावली. त्यानंतर या भागातील वाहनांच्या काचा दगडाने फोडणे सुरू केले. सुमारे अर्धा तास एक ते दीड किलोमीटर परिसरातील वाहनांची या समाजकंटकांनी तोडफोड केली. भल्या सकाळी नागरिकांना जाग आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर परिसरात संतापाची लाट उसळली. अनेकांनी बेलतरोडी पोलिसांना माहिती दिली. ठाणेदार विजय आकोत यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळ परिसरात धाव घेतली. त्या भागातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. त्यात सर्व वाहनांची तोडफोड हे तीन समाजकंटक करीत असल्याचे दिसून आले. त्यामुळे आरोपींच्या वर्णनाशी मिळत्याजुळत्या १० ते १५ संशयितांना गुरुवारी दुपारपर्यंत पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची पोलीस चौकशी करीत होते.
पंच्यांशी प्लॉटमध्येही कार फोडली
समाजकंटकांनी ८५ प्लॉट परिसरातही एका कारची तोडफोड केली. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा भाग येतो. त्यामुळे नरेंद्रनगरात तोडफोड करणारे समाजकंटक इकडून तिकडे गेले असावेत, किंवा तिकडून इकडे तोडफोड करीत आले असावेत, असा अंदाज आहे.