व्हीएनआयटीमध्ये गोंधळ : सुरक्षा रक्षकांच्या नियुक्तीचा वाद चिघळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2020 08:19 PM2020-10-20T20:19:58+5:302020-10-20T20:21:18+5:30
VNIT, Controversy erupts over appointment security guards,Nagpur Newsव्हीएनआयटीच्या सुरक्षा एजन्सीमधील दोन गटातील वाद सोमवारी चांगलाच चिघळला. सुरक्षा रक्षकांच्या एका गटाने दुसऱ्या गटावर हल्ला चढवून तेथे तोडफोड केली. त्यामुळे व्हीएनआयटी परिसरात रात्रीपर्यंत तणावाचे वातावरण होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : व्हीएनआयटीच्या सुरक्षा एजन्सीमधील दोन गटातील वाद सोमवारी चांगलाच चिघळला. सुरक्षा रक्षकांच्या एका गटाने दुसऱ्या गटावर हल्ला चढवून तेथे तोडफोड केली. त्यामुळे व्हीएनआयटी परिसरात रात्रीपर्यंत तणावाचे वातावरण होते. या प्रकरणाची तक्रार मिळाल्यानंतर बजाजनगर पोलिसांनी विविध गुन्हे दाखल करून १० जणांना सोमवारी सायंकाळी अटक केली.
व्हीएनआयटीची सुरक्षा एजन्सी काही दिवसांपूर्वी बदलवण्यात आली. त्यामुळे पूर्वी कार्यरत १७० सुरक्षा रक्षकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. कामावर घ्यावे म्हणून ही मंडळी गेल्या काही दिवसांपासून व्हीएनआयटीच्या गेटसमोर आंदोलन करीत आहेत. मात्र त्यांच्यातील केवळ ५० जणांनाच कामावर घेतल्याने उर्वरित मंडळींमध्ये खदखद आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी दुपारी २.३० च्या सुमारास वादाला सुरुवात झाली. काही जणांनी जबरदस्तीने आत शिरण्याचा प्रयत्न केला. त्यांना अटकाव करणाऱ्यांना मारहाण केली. चौकीची तोडफोड करून तेथील टेलिफोन वायर तोडला. काचा फोडल्या. यामुळे तेथे एकच गोंधळ उडाला. माहिती कळताच बजाजनगरचे ठाणेदार महेश चव्हाण आपल्या ताफ्यासह तेथे पोहचले. त्यांनी गोंधळ घालणाऱ्यांना ताब्यात घेतले. सुरक्षा एजन्सीचे प्रमुख मनोज देवीदास भोयर यांची तक्रार नोंदवून आरोपी मंगलेश जनीराम पुरंजकर, भगतराम केशवराव राजन, मनीष आनंदराव गणोर, नंदकिशोर रामरावजी जाधव, अरुण पांडुरंग बनकर, ममता प्रकाश मेंढे, भाविका चंद्रशेखर यादव, चंदा दिनेश रंगारी, विजय राजेश शेळके, टेरेजा लिंगा मिंज यांच्याविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला. आरोपींना रात्री समजपत्र देऊन सोडून देण्यात आले.