राज्यातील १० मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता प्रभारी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 04:58 AM2019-05-30T04:58:19+5:302019-05-30T04:58:25+5:30
राज्यात वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयांतर्गत येणाऱ्या १९ पैकी १० शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची जबाबदारी प्रभारी अधिष्ठाता सांभाळत आहे.
नागपूर : राज्यात वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयांतर्गत येणाऱ्या १९ पैकी १० शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची जबाबदारी प्रभारी अधिष्ठाता सांभाळत आहे. ही पदे तातडीने न भरल्यास मेडिकलमधील अनेक प्रश्न रेंगाळण्याची शक्यता आहे.
मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाने (एमसीआय) शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या (पीजी) जागा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात ८०० जागा प्रस्तावित आहे. २०० जागा आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गासाठी असणार आहेत. या जागा हमखास वाढण्याची शक्यता आहे. उर्वरित जागा खेचून आणण्यासाठी सर्वच मेडिकल कॉलेजचा कस लागणार आहे. अधिष्ठाता पदे भरण्यासाठी पदोन्नती मोहीम राबविण्यात आलेली नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने निवड केलेल्या व्यक्तींनाही पदभार दिला गेला नाही. नियुक्तीवर आठवड्यात निर्णय होण्याची शक्यता आहे.