नागपूरच्या मानस चौकातील ई-तिकीट कार्यालयावर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 01:21 AM2018-05-22T01:21:59+5:302018-05-22T01:22:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) पथकाने सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास मानस चौकातील रेल्वेची ई-तिकिटे विकणाऱ्या न्यू नागपूर ट्रॅव्हल्सच्या कार्यालयावर धाड टाकून लाखो रुपयांची अनधिकृत रेल्वे तिकिटे जप्त केली. कारवाईदरम्यान ट्रॅव्हल्सच्या संचालकांनी जोरदार हंगामा केला.
आरोपींमध्ये बाबा फरीदनगर येथील रहिवासी मुकेश किशनलाल कुकरेजा (४६) व दिलीप किशनलाल कुकरेजा यांचा समावेश आहे. रेल्वे तिकिटांचा काळाबाजार थांबविण्यासाठी आरपीएफने गेल्या चार दिवसांत केलेली ही दुसरी मोठी कारवाई आहे. त्यामुळे दलालांमध्ये खळबळ माजली आहे. आरपीएफ कमांडन्ट ज्योतिकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनधिकृतपणे रेल्वे तिकिटे मिळवून ते प्रवाशांना चढ्या दरात विकत होते. त्याची माहिती मिळाल्यानंतर धाड टाकण्यात आली. दरम्यान, आरोपींनी पथकाला धमकावणे सुरू केले. कार्यालयाला लाग लावून पथकातील सदस्यांना फसविण्याची धमकी दिली. सदस्यांना बिल बुक व संगणकाची तपासणी करू दिली नाही. त्यामुळे कमांडेन्ट सतिजा घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पोलीस उपायुक्त राकेश ओला यांना आरोपींच्या हंगाम्याची सूचना दिली. तपासणीमध्ये आरोपींनी मोठ्या संख्येत अनधिकृत रेल्वे तिकिटे मिळविल्याचे पुढे आले.