कांबळे दुहेरी हत्याकांडातील आरोपींविरुद्ध दोषारोप निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 11:36 PM2019-02-15T23:36:35+5:302019-02-15T23:37:36+5:30
सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए.एस. काझी यांनी शुक्रवारी बहुचर्चित कांबळे दुहेरी हत्याकांडातील आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३०२, ३९४, ३६४, २०१, १२०-ब, ३४ व अॅट्रॉसिटी कायद्यातील कलम ३ (२)(५) अंतर्गतचे दोषारोप निश्चित केले. तसेच, सुनावणीचा कार्यक्रम निश्चित करण्यासाठी १ मार्च ही पुढील तारीख दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए.एस. काझी यांनी शुक्रवारी बहुचर्चित कांबळे दुहेरी हत्याकांडातील आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३०२, ३९४, ३६४, २०१, १२०-ब, ३४ व अॅट्रॉसिटी कायद्यातील कलम ३ (२)(५) अंतर्गतचे दोषारोप निश्चित केले. तसेच, सुनावणीचा कार्यक्रम निश्चित करण्यासाठी १ मार्च ही पुढील तारीख दिली.
आरोपींमध्ये गणेश शिवभरण शाहू, गुडिया ऊर्फ गुड्डी गणेश शाहू, अंकित शिवभरण शाहू व एक अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. या चारही आरोपींना कडक पोलीस बंदोबस्तात न्यायालयामध्ये हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना त्यांच्यावरील दोषारोप वाचून दाखवले व ते दोषारोप कबूल आहेत का अशी विचारणा केली. त्यावर आरोपींनी नकारात्मक उत्तर दिले. परिणामी, त्यांच्याविरुद्ध नियमानुसार खटला चालविण्याचा निर्णय घेण्यात आला.
सरकार पक्षाच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी १७ फेब्रुवारी २०१८ रोजी उषा कांबळे व त्यांची चिमुकली नात राशी यांचा निर्घृण खून केला. घटनेच्या दिवशी आरोपी गणेश व उषा कांबळे यांच्यामध्ये भिसीच्या पैशांवरून वाद झाला होता. त्यानंतर आरोपींनी उषा यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या दीड वर्षीय राशीचाही निर्घृण खून केला. त्यानंतर दोघांचेही मृतदेह नाल्यात फेकून दिले. आरोपी पवनपुत्रनगर, हुडकेश्वर येथील रहिवासी आहेत. न्यायालयात सरकारतर्फे अॅड. नितीन तेलगोटे तर, फिर्यादीतर्फे अॅड. समीर सोनवणे यांनी कामकाज पाहिले. आरोपींचे वकील अॅड. देवेंद्र चव्हाण यांनी प्रकरणातील वकीलपत्र मागे घेतले. परिणामी, आरोपींना दुसरा वकील नियुक्त करावा लागणार आहे.