वनभवनातील माहिती व प्रसिद्धी अधिकाऱ्याचे पद प्रभारीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:09 AM2021-09-24T04:09:32+5:302021-09-24T04:09:32+5:30
नागपूर : वनविभाग माहिती व तंत्रज्ञानाने अद्ययावत होत आहे. या विभागात मंत्रालय स्तरावर नवनवे निर्णय होत असून नागपुरातील वनभवनातून ...
नागपूर : वनविभाग माहिती व तंत्रज्ञानाने अद्ययावत होत आहे. या विभागात मंत्रालय स्तरावर नवनवे निर्णय होत असून नागपुरातील वनभवनातून अनेक योजना कार्यान्वित होत आहे. असे असले तरी माध्यमांशी समन्वय राखणारे येथील माहिती व प्रसिद्धी अधिकाऱ्याचे पद मात्र प्रभारी अधिकाऱ्याकडेच आहे.
२०१८ मध्ये या पदाची जबाबदारी डीएफओ स्नेहल पाटील यांच्याकडे प्रभारी म्हणून देण्यात आली होती. त्या पदोन्नतीवर डीएफओ म्हणून वनविभागाच्या मुख्यालयी नागपूर येथे रुजू झाल्या होत्या. माहिती व प्रसिद्धी अधिकाऱ्याचे येथील पद रिक्त असल्याने आल्याआल्याच त्यांच्याकडे विभागाची सूत्रे सोपविण्यात आली होती. तीन वर्षांच्या कार्यकाळानंतर आता त्यांची वनविभागाच्या बजेट विभागात बदली झाल्यामुळे हे पद पुन्हा रिक्त झाले आहे. या पदावर कायमस्वरूपी अधिकारी मिळण्याची अपेक्षा असताना आता वनकर्मचारी दिलीप टेकाडे यांच्याकडे या पदाचा प्रभार सोपविण्यात आला आहे.
वनविभाग एकीकडे हायटेक होत असताना येथील माहिती व प्रसिद्धी विभागाकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. यामुळे वनविभागातील घडामोडींची माहिती मिळविताना माध्यम प्रतिनिधींना बरीच धावपळ करावी लागत असल्याचा अनुभव आहे.