एका ‘क्लिक’वर भरता येणार शुल्क
By admin | Published: January 15, 2016 03:30 AM2016-01-15T03:30:28+5:302016-01-15T03:30:28+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात विविध शुल्क भरण्यासाठी विद्यार्थ्यांना रांगेमध्ये ताटकळत उभे राहावे लागते.
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात विविध शुल्क भरण्यासाठी विद्यार्थ्यांना रांगेमध्ये ताटकळत उभे राहावे लागते. परंतु आता मात्र केवळ एका ‘क्लिक’वर हे शुल्क भरता येणार आहे. नागपूर विद्यापीठातील आर्थिक व्यवहार ‘आॅनलाईन’ करण्यासाठी ‘ई’ सेवा सुरू करण्यात येणार आहे. यासंदर्भात गुरुवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या तातडीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला, अशी माहिती सूत्रांनी दिली.
नागपूर विद्यापीठाच्या आर्थिक कारभारात एकसूत्रता आणण्यात यावी, अशी काही काळापासून मागणी होत आहे. विविध शुल्कांसाठी विद्यापीठाच्या ‘काऊंटर’वर पैसे भरणे हे एखाद्या शिक्षेप्रमाणेच असते. लांबलचक रांग आणि कर्मचाऱ्यांची आडमुठेपणाची वागणूक यामुळे विद्यार्थी हैराण होतात. शिवाय महाविद्यालयांनादेखील विविध शुल्क भरणे सोयीचे व्हावे यासाठी ‘ई’ सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी विद्यापीठाने पाच बँकांसोबत चर्चादेखील केली आहे. १ एप्रिलपासून ही सेवा सुरू करण्यात येईल. विद्यार्थी ‘नेट बँकिंग’ किंवा ‘डेबिट’, ‘क्रेडिट कार्ड’च्या साहाय्याने शुल्क भरू शकणार आहेत.(प्रतिनिधी)