चुनाभट्टी खुनी हल्ल्यातील आरोपीचा जामीन फेटाळला
By admin | Published: May 15, 2016 02:42 AM2016-05-15T02:42:44+5:302016-05-15T02:42:44+5:30
धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चुनाभट्टी येथील एका खुनी हल्ल्याच्या घटनेतील आरोपी सूत्रधाराचा जामीन आदेश...
नागपूर : धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चुनाभट्टी येथील एका खुनी हल्ल्याच्या घटनेतील आरोपी सूत्रधाराचा जामीन आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश मोहम्मद सादिक उमर यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला.
निकुंज कमलाकर मेश्राम (२६) असे आरोपीचे नाव असून, तो दाभा येथील रहिवासी आहे. प्रकरण असे की, कौशल्यायननगर येथील फिर्यादी अनिता संजय अलोणे हिचा पती संजय अलोणे आणि साथीदारांनी फरार असलेला मुख्य सूत्रधार रामबाग येथील रहिवासी बादल राजू गजभिये याचे वडील राजू गजभिये यांचा गतवर्षी क्षुल्लक कारणावरून सशस्त्र हल्ला करून खून केला होता. वडिलाच्या खुनाचा सूड म्हणून बादलने आपल्या साथीदारांची जुळवाजुळव करून चुनाभट्टी भागात २५ एप्रिल २०१६ रोजी रात्री ९.३० ते ११ वाजताच्या दरम्यान तलवार, लाठीकाठ्या आणि दगडाने हल्ला करून संजय अलोणे याचा मुलगा सौरभ (१९) याला गंभीर जखमी केले होते.
याप्रकरणी अनिता अलोणे हिच्या तक्रारीवरून धंतोली पोलिसांनी भादंविच्या १४३, १४७, १४८, १४९, ३४१, ३०७, ३९७, १०२ (ब), २०१, शस्त्र कायद्याच्या ४/२५, मुंबई पोलीस कायद्याच्या ३७(१)(३), १३५, १४२ कलमान्वये गुन्हा दाखल करून नऊ आरोपींना अटक केली होती.
त्यापैकी तीन जण विधिसंघर्षग्रस्त बालक आहेत. अटक झालेल्या अन्य आरोपींमध्ये अमन जीवन खरे (२२) रा. न्यू वाल्मिकी कॉलनी इमामवाडा, अश्वजित ऊर्फ मोन्टी राजेंद्र कांबळे (२२), प्रशांत ऊर्फ टन्ना कृष्णराव लोंढे (२२) दोन्ही रा. वसंतनगर झोपडपट्टी, शुभम शंकर पारखंडे (२१), मोनू ऊर्फ छोटा पन्नी सुरेश कटोते (१९) दोन्ही रा. कौशल्यायननगर यांचा समावेश आहे.
या प्रकरणातून मुख्य सूत्रधार बादल राजू गजभिये याच्यासह पलाश विजय दिवटे (२२) रा. अयोध्यानगर, आदित्य प्रदीप बागडे (२१) कुकडे ले-आऊट आणि प्रणय राजेंद्र कांबळे (२०) रा. वसंतनगर हे फरार आहेत. अटक आरोपींपैकी निकुंज मेश्राम याने जामिनासाठी अर्ज दाखल केला असता, प्रकरण गंभीर असल्याने तो न्यायालयाने फेटाळून लावला. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील वसीम काझी यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)