‘न्यूड डान्स’प्रकरणी उमरेड पाठोपाठ कुही व मौदा ठाण्यात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2022 12:38 PM2022-01-25T12:38:38+5:302022-01-25T13:23:40+5:30
उमरेड तालुक्यातील बाम्हणी येथील डान्स हंगामा प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत ११ आरोपींना अटक केली आहे.
उमरेड (नागपूर) : उमरेड तालुक्यातील बाम्हणी येथील ‘न्यूड डान्स’ प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. कुही आणि मौदा पोलीस ठाण्यात सुद्धा याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिल्ली व भूगाव याठिकाणी ‘डांस हंगामा’ कार्यक्रमात अश्लील प्रदर्शन झाल्याचे पोलीस तपासात आढळून आले आहे.
उमरेड तालुक्यातील बाम्हणी येथील डान्स हंगामा प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत ११ आरोपींना अटक केली आहे. एलेक्स उर्फ प्रबुद्ध गौरीशंकर बागडे (४०) रा. दिघोरी नागपूर याच्यासह कार्यक्रमाचे आयोजक चंद्रशेखर उर्फ लाला मांढरे, सूरज नागपुरे, अनिल दमके या चौघांना न्यायालयात हजर केले असता २६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. अन्य सात आरोपींची नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
कुही तालुक्यातील सिल्ली येथे १६ आणि १७ जानेवारी रोजी दोन दिवस विनापरवानगीने आणि गावातील लोकांची गर्दी जमवून कोरोना नियमावलीचा भंग करीत डान्स हंगामा कार्यक्रम झाला. याप्रकरणी दोन वेगवेगळ्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. दिलीप सोनसरे, चरनदास पडोळे, लालाजी दंडारे, रजत सोनसरे, दिलीप सोनसरे सर्व रा. सिल्ली तसेच सौरभ दंडारे रा. कुही तसेच पंकज मस्के, सूरज कारमोरे, प्रशांत कुर्जेकार, शुभम भिवगडे, प्रशांत भिवगडे, मनोज मस्के, अंबादास लांजेवार सर्व रा. सिल्ली व इतर आयोजक साथीदारांवर कारवाई करण्यात आली आहे.
याप्रकरणी कुही पोलीस ठाण्यात १८८, २६९, २७० भादंवि आपत्ती व्यवस्थापन कायदा २,३,४ अन्वये दोन गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती तपास अधिकारी पूजा गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी भीमराव टेढे, सहायक पोलीस निरीक्षक शुभांगी वाझे यांनी दिली. सिल्ली येथे १७ जानेवारीला भंडारा येथील सुंदरम डान्स ग्रुपचे सादरीकरण होते, अशीही माहिती मिळाली.
कामठी तालुक्यातील भूगाव गावाचा कारभार मौदा पोलीस ठाणे अंतर्गत चालतो. मौदा पोलीस ठाण्यातसुद्धा याप्रकरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. २० जानेवारी रोजी भूगाव येथे ‘डान्स हंगामा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
उमरेडनंतर कुही आणि मौदा ठाण्यात विविध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. उमरेड प्रकरणात आणखी तीन महिलांची चौकशी केली जात असून तपासाअंती योग्य पाऊल उचलणार आहोत.
पूजा गायकवाड, तपास अधिकारी