पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून हुंड्यासाठी डॉक्टर पत्नीचा छळ, गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2022 12:31 PM2022-07-26T12:31:49+5:302022-07-26T14:54:14+5:30
‘तू युजलेस आहे व मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत येऊ नको’ असे म्हणत पतीने तिला घरी येण्यास नकार दिला.
नागपूर : चंद्रपूर येथील एका पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून हुंड्यासाठी पशुवैद्यकीय डॉक्टर पत्नीचा छळ करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. सततच्या जाचाला कंटाळून पत्नीने वाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविल्यावर संबंधित अधिकारी व त्याच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
जिशांत नंदेश्वर (२८) असे संबंधित अधिकाऱ्याचे नाव असून त्याचे २०२१ साली लग्न झाले होते. तिच्या आईचे लहानपणीच निधन झाले होते व वडिलांचे २०१७ साली निधन झाले. त्यानंतर तिच्या आत्यानेच सांभाळ केला. त्याची व त्याच्या पत्नीची ओळख ऑनलाइन विवाहजोडणी संकेतस्थळावर झाली होती.लग्नानंतर ते ब्रह्मपुरीला राहायला गेले. लहानसहान गोष्टींवरून सासरच्या मंडळींनी तिला त्रास देण्यास सुरुवात केली. पतीनेदेखील तिचा छळ सुरू केला.
तुला स्वयंपाक येत नाही, कामे करता येत नाहीत असे टोमणे मारत आजीकडून ३० लाख रुपये घेऊन ये यासाठी मानसिक दबाव टाकत होता. जिशांतचा मामा-मामीदेखील त्रास द्यायचे. ९ मे रोजी तरुणी उपचारासाठी नागपुरात आली होती व रामनगरमधील इस्पितळात उपचार झाल्यावर तिने पतीला फोन केला. परंतु ‘तू युजलेस आहे व मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत येऊ नको’ असे म्हणत पतीने तिला घरी येण्यास नकार दिला.
मुलगी नाइलाजाने आजीच्या घरी रहायला गेली. त्यानंतर परत फोन केला असता एसयूव्ही कार घ्यायची असल्याने आजीकडून ३० लाख रुपये आण असे पतीने सांगितले. अखेर तरुणी आपल्या आजीसह १३ मे रोजी सासरी गेली असता पैसे आणले असतील तरच घरात पाऊल ठेव अशी सासरच्यांनी भूमिका घेतली. तरुणीला तेथून आजीसह परत नागपूरला परतावे लागले. सातत्याने होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून अखेर तरुणीने वाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी पतीसोबतच दिलीप कऱ्हाडे, अरुण कऱ्हाडे, ज्योती कऱ्हाडे, भाग्यश्री कऱ्हाडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.