आरोग्य सेवेसाठी धर्मादाय संस्थांनी समोर यावे

By Admin | Published: September 12, 2015 02:45 AM2015-09-12T02:45:57+5:302015-09-12T02:45:57+5:30

सरकारकडून शासकीय वैद्यकीय रुग्णालयांना चांगल्या पद्धतीने चालविणे कठीण होत आहे.

Charities should come forward for health service | आरोग्य सेवेसाठी धर्मादाय संस्थांनी समोर यावे

आरोग्य सेवेसाठी धर्मादाय संस्थांनी समोर यावे

googlenewsNext

नितीन गडकरी : १५ वी राष्ट्रीय परिषद ‘एफएचएनओ’चे थाटात उद्घाटन
नागपूर : सरकारकडून शासकीय वैद्यकीय रुग्णालयांना चांगल्या पद्धतीने चालविणे कठीण होत आहे. या रुग्णालयांना धर्मादाय संस्थांनी मदत केल्यास रुग्णालयाचा उद्देश पूर्ण होऊ शकेल. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार यावर जास्त भर देत आहे. सोबतच अशा संस्थांना समोर आणण्यासाठी यथासंभव मदत करण्यास तयार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.
विदर्भ सोसायटी फॉर हेड अ‍ॅण्ड नेक आॅन्कोलॉजीच्यावतीने आयोजित ‘फाऊंडेशन आॅफ हेड-नेक आॅन्कोलॉजी आॅफ इंडिया’च्या (एफएचएनओ) १५व्या वार्षिक राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनाप्रसंगी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा, खासदार अजय संचेती, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. किशोर टावरी, फाऊंडेशन हेड अ‍ॅण्ड नेक आॅन्कोलॉजीचे अध्यक्ष डॉ. ज्योती दाभोळकर, विदर्भ सोसायटी आॅफ हेड अ‍ॅण्ड नेक आॅन्कोलॉजीचे अध्यक्ष आणि या परिषदेच्या आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. मदन कापरे, सचिव डॉ. आलोक ठाकूर, आयोजक सचिव राजेंद्र देशमुख, डॉ. विक्रम केकतपुरे आणि डॉ. आर. रवी उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, भारतीय डॉक्टरांना संपूर्ण जगात सन्मानाच्या दृष्टीने पाहिले जाते. जगातील दहा सर्वात सन्मानित डॉक्टरांमध्येही भारतीय आहेत. डॉक्टरांचे कार्य सामजिक बांधिलकीचे आहे. वर्तमानातील काळ हा विज्ञान, प्रौद्योगिकी आणि संशोधनाचा आहे. यामुळे वैद्यकीय क्षेत्रात निरंतर संशोधन होण्याचे आणि त्याचे फायदे तळागळातील लोकापर्यंत पोहचविणे आवश्यक आहे. ते म्हणाले, डॉ. मदन कापरे यांचे कौतुक करताना रुग्ण त्यांना देव म्हणून संबोधतात. हा त्यांच्यासाठी सन्मान आहे.
कार्यक्रमात युवा डॉक्टर नीरव त्रिवेदी आणि डॉ. कृष्णकुमार यांच्या ‘हेड अ‍ॅण्ड नेक सर्जरी’वरील पुस्तकाचे प्रकाशन खा. विजय दर्डा यांच्या हस्ते करण्यात आले. सोहळ्याची सुरुवात गीताने झाली. यात सहभागी सुदीप्त मुखर्जी व वसुधा दत्ता या दोन कॅन्सरच्या रुग्णानी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी लोकांना तंबाखूजन्य व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आणि शेवटी सुवर्णा माटेगांवकर यांनी गीत सादर केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. संजय तत्त्ववादी यांनी केले. या सोहळ्याला मिलान विद्यापीठाचे विभाग प्रमुख डॉ. फेड्रिको बीगलीओली, फिस्टवेल्लर कॅन्सर सेंटरच्या प्रा. चेरीअन नाथन, काग्लीअरी स्कूल आॅफ मेडिसीनचे प्रा. रॉबर्टाे पीक्षेड्डू, शासकीय दंत रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनय हजारे, डॉ. बी.के. शर्मा, डॉ. राजू खंडेलवाल, डॉ. अपूर्व पावडे, डॉ. अभिषेक वैद्य, डॉ. विवेक हरकरे, डॉ. मृदुला कापरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
संसद भवनासाठी बॅटरी संचालित बस
गडकरी यांनी संशोधनाचे उदाहरण देत सांगितले की, काही महिन्यांपूर्वी इस्रोच्या एका वैज्ञानिकाची भेट झाली. त्यांनी सांगितले की, अंतरिक्षामध्ये पाठविण्यात येणाऱ्या ‘यान’मध्ये उपयोगात आणली जाणारी ‘लिथियन आयन बॅटरी’मुळे रस्त्यावर वाहन चालविणे स्वस्त होऊ शकते. नंतर यावर संशोधन केले, तर ते यशस्वी ठरले. यामुळे येत्या काही दिवसांत याचा वापर इंधनावर चालणाऱ्या बसमध्ये करण्यात येईल. प्रायोगिक स्तरावर ही बॅटरी संचालित दोन बसेस संसद भवनाला देण्यात येईल.

शासकीय सेवेत असणाऱ्यांना शासकीय
शाळा व रुग्णालय बंधनकारक करावे

खा. दर्डा म्हणाले, भारत सरकार आरोग्यावर केवळ ३३ हजार कोटी रुपये खर्च करते. देशाची लोकसंख्या १२४ कोटी आहे. याच्या तुलनेत ही रक्कम फारच तोकडी आहे. देशात ‘हेड अ‍ॅण्ड नेक’चे केवळ १९ सेंटर आहेत. कॅन्सरचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे टाटा कॅन्सरसारखे हॉस्पिटल प्रत्येक शहरात असणे आवश्यक झाले आहे. देशात शासकीय शाळा आणि रुग्णालयांची स्थिती वाईट आहे. गावातील सरपंचापासून ते मंत्र्यांपर्यंत आणि शासकीय नोकरीत असणाऱ्यांच्या मुलांना शासकीय शाळेतून शिक्षण देण्याचे व शासकीय रुग्णालयातूनच उपचार घेण्याचे जोपर्यंत बंधनकारक करणार नाही तोपर्यंत या दोन्ही व्यवस्थेत सुधार होणार नाही. डॉक्टरांनी निष्ठेने आणि प्रामाणिकपणाने आपली सेवा द्यावी, असे आवाहन करीत त्यांनी १५ व्या राष्ट्रीय परिषदेत संपूर्ण देशाला नागपुरात आणणारे डॉ. मदन कापरे यांचे विशेष कौतुक केले.

बदलत्या जीवनशैलीमुळे कॅन्सर वाढतोय
खा. अजय संचेती म्हणाले, बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर होत आहे. कॅन्सरचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी ‘एफएचएनओ’ सारखी संस्था कौतुकास्पद काम करीत आहे. लवकरच नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटतर्फे ५०० खाटांचे रुग्णालय तयार होत आहे. याचे काम सुरू आहे. डॉ. कापरे हे आपल्या कामाच्या माध्यमातून अन्य चिकित्सकांना प्रेरणा देत आहे, असेही ते म्हणाले.

सामाजिक बांधिलकीची जोड आवश्यक
डॉ. किशोर टावरी म्हणाले, डॉक्टरांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी असले पाहिजे. ते आपल्या विषयात कितीही निपुण असले तरी सामजिक बांधिलकीची जोड नसेल तर ते चांगले डॉक्टर म्हणून कधीही आपले नाव कमावू शकणार नाही. म्हणूनच प्रत्येक वैद्यकीय डॉक्टरांनी स्वयंशिस्त होऊन नैतिकेने व्यवसाय करावा. डॉक्टरांकडून समाजाच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही तर शासनाकडून अनेक जाचक कायदे येऊ शकतील.

Web Title: Charities should come forward for health service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.