नवलच! नखावर मावेल एवढा चरखा; जयंत तांदूळकर यांची कल्पकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2020 10:35 AM2020-10-02T10:35:18+5:302020-10-02T10:36:14+5:30
Mahatma Gandhi, Charkha, Nagpur News नागपुरातील जयंत तांदूळकर यांनी नखावर मावेल एवढा चरखा साकारला आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताला समर्पित केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तुम्ही उद्योगपती असा वा सामान्य कर्मचारी, नोकरदार असा वा मजूर... अभिव्यक्तीचे प्रांत कुणालाच मुकले नाहीत. केवळ प्रकांड इच्छेचा आधार असावा लागतो, एवढेच. नागपुरातील झिंगाबाई टाकळी येथील निवासी व महालेखाकार कार्यालयात वरिष्ठ लेखापाल म्हणून कार्यरत असलेले जयंत तांदूळकर यांनीही आपल्या अभिव्यक्तीला अशाच प्रकांड इच्छेचा आधार दिला आणि नित्य नव्या कलाकृती साकारण्याचा पराक्रम केला आहे. त्यांनी नखावर मावेल एवढा चरखा साकारला आहे आणि हा चरखा महात्मा गांधी यांच्या स्वदेशी संकल्पनेला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताला समर्पित केला आहे.
जयंत तांदूळकरांनी सूत कातणाऱ्या चरख्याचे विविध मॉडेल साकारले आहेत. त्यातील सर्वात लहान चरखा ३.२० मि.मी. लांबीचा, २.६८ मि.मी. रुंदीचा अन् ३.०६ मि.मी. उंचीचा आहे. यासाठी त्यांनी अगदी लहान लाकडी स्टिक, स्टील वायर, कॉटनचा धागा यांचा वापर केला आहे. विशेष म्हणजे हा चरखा केवळ दिखावा किंवा प्रतिरूप नव्हे तर यावर सूत कातता येते. हा चरखा पूर्णपणे कार्यरत असून, गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड व अन्य विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय रेकॉर्डसाठी नामांकित करण्यात आला आहे. हा जगातील सर्वात लहान चरखा असल्याचा तांदूळकर यांचा दावा आहे.
स्वातंत्र्ययुद्धातील प्रमुख शस्त्र म्हणून महात्मा गांधी यांनी चरखा वापरला होता. स्वदेशीचा नारा दिला होता. त्याच नाºयाच्या अनुषंगाने आत्मनिर्भर भारताचे बीजारोपण झाले होते. नव्या युगात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हाच नारा दिला आहे. त्याच संकल्पनेला दृढ करण्यासाठी माझा हा अत्यंत लहान चरखा आहे.
- जयंत तांदूळकर
(कलाकार व वरिष्ठ लेखापाल)
अनेक कलाकृती
तांदूळकर यांनी खाट, पेन स्टॅण्ड, माचीस बॉक्स, लहान बैलबंडी, बैलगाडा, छकडा, टांगा, सोफासेठ, टेबल खुर्ची, सर्वात लहान श्रीमद्भगवद्गीता आदी साकारल्या आहेत.