चार्टर्ड अकाऊंटंट हे सजग बँकर्स
By admin | Published: January 2, 2017 02:24 AM2017-01-02T02:24:43+5:302017-01-02T02:24:43+5:30
बँकिंग क्षेत्राच्या विकासात चार्टर्ड अकाऊंटंटची महत्त्वाची भूमिका आहे. संपूर्ण बँकिंग क्षेत्र आपल्या संस्थेसाठी कठोर परिश्रम घेत आहे,
एच.के. भुटानी : ‘बँकांच्या समवर्ती आॅडिटवर प्रमाणपत्र अभ्यासक्रम’ विषयावर सीए संस्थेतर्फे समूह चर्चा
नागपूर : बँकिंग क्षेत्राच्या विकासात चार्टर्ड अकाऊंटंटची महत्त्वाची भूमिका आहे. संपूर्ण बँकिंग क्षेत्र आपल्या संस्थेसाठी कठोर परिश्रम घेत आहे, पण करण्यात येणारे काम योग्य वा अयोग्य, यावर चार्टर्ड अकाऊंटंट मदत करीत आहेत. सध्याच्या परिदृश्यात एक सजग बँकर्स म्हणून त्यांची भूमिका असल्याचे मत पंजाब नॅशनल बँकेचे उपमहाव्यवस्थापक एच.के. भुटानी यांनी येथे व्यक्त केले.
‘बँकांच्या समवर्ती आॅडिटवर प्रमाणपत्र अभ्यासक्रम’ या विषयावर सीए नागपूर संस्थेतर्फे धंतोली येथील सभागृहात आयोजित समूह चर्चेत बँकिंग सदस्य म्हणून ते बोलत होते.
समूह चर्चेत आयडीबीआय बँकेचे उपमहाव्यवस्थापक सीए जगन्नाथ शाहू यांनी मत मांडले. ते म्हणाले, चार्टर्ड अकाऊंटंट हे समवर्ती आॅडिटर म्हणून भूमिका पार पाडतात. उद्भवणाऱ्या समस्यांवर लक्ष वेधून त्या वेळेत ध्यानात आणून द्याव्यात. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात त्यांनी नेहमीच अद्ययावत राहावे. त्यामुळे ते आपल्या व्यवसायाला न्याय देऊ शकतील.
राष्ट्रीय आर्थिक सल्लागार समितीचे सदस्य जुल्फेश शाह यांनी समूह चर्चेचे संचालन केले. ते म्हणाले, चार्टर्ड अकाऊंटंटमध्ये अधिकाधिक तांत्रिक कौशल्य असते. बँकर्स आणि बँकिंग इंडस्ट्रीसोबत भागीदार म्हणून काम करताना आपल्या अनुभवनाने जास्तीत जास्त फायदा मिळवून देऊ शकतात.
प्रारंभी सीए नागपूर संस्थेचे अध्यक्ष स्वप्निल घाटे यांनी ‘बँकांच्या समवर्ती आॅडिटवर प्रमाणपत्र अभ्यासक्रम’ या विषयाचे महत्त्व समजावून सांगितले. सदस्यांना वेळोवेळी अद्ययावत राहण्यासाठी संस्थेतर्फे या अभ्यासक्रमासोबतच अन्य विविध अभ्यासक्रमाचे डिझाईन करण्यात येते.
नागपूर सीए संस्थेचे उपाध्यक्ष संदीप जोतवानी यांनी चर्चेचे समन्वयन केले. सचिप उमंग अग्रवाल यांनी आभार मानले. या वेळी सुरेन दुरगकर, कीर्ती कल्याणी, प्रीतम बत्रा, प्रतीक सारडा आणि चार्टर्ड अकाऊंटंट मोठ्या संख्येने उपस्थित होते.(प्रतिनिधी)