चार्टर्ड अकाऊंटंट्सने सामान्यांना शिक्षित करावे - विजय दर्डा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 05:11 AM2018-07-11T05:11:55+5:302018-07-11T05:12:22+5:30
देशात मूल्य आधारित आर्थिक व्यवस्था चार्टर्ड अकाऊंटंट (सीए) पुढे नेऊ शकतो. जगात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास ६ ते ७ टक्के दराने होत आहे. त्यात सीएंची भूमिका अधिकाधिक महत्त्वाची होत असून सीएंनी सामान्य लोकांनाही शिक्षित करावे
नागपूर : देशात मूल्य आधारित आर्थिक व्यवस्था चार्टर्ड अकाऊंटंट (सीए) पुढे नेऊ शकतो. जगात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास ६ ते ७ टक्के दराने होत आहे. त्यात सीएंची भूमिका अधिकाधिक महत्त्वाची होत असून सीएंनी सामान्य लोकांनाही शिक्षित करावे, असे मत लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी व्यक्त केले.
उत्तर अंबाझरी मार्गावरील आयएमए सभागृहात सीए विद्यार्थ्यांच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेत प्रमुख अतिथी म्हणून दर्डा बोलत होते. मंचावर विशेष अतिथी म्हणून आयसीएआयचे माजी अध्यक्ष जयदीप शाह, परिषदेचे संचालक व आयसीएआयच्या सेंट्रल कौन्सिलचे सदस्य निहाल जांबुसरिया, आयसीएआयच्या पश्चिम विभागाचे सदस्य अभिजित केळकर, नागपूर सीए संस्थेचे अध्यक्ष उमंग अग्रवाल, उपाध्यक्ष सुरेन दुरगकर, सचिव किरीट कल्याणी, कोषाध्यक्ष साकेत बागडिया, ‘विकासा’ अध्यक्ष जितेंद्र सागलानी, उपाध्यक्षा ख्याती गट्टानी, सचिव अपेक्षा गुंडेचा उपस्थित होते.
दर्डा म्हणाले, अशोक चांडक यांच्या कारकीर्दीत एका सर्वेक्षणात भारतात १० हजार लोकांमागे एका सीएची आवश्यकता असेल, असे म्हटले होते. त्यानुसार १० ते १२ लाख सीएंची गरज आहे. पण आज जवळपास २.७५ लाख सीए आहेत. नागपुरातील ७०० विद्यार्थ्यांनी सीए कोर्स निवडल्याचा आनंद आहे. दर्डा यांनी महिला सीएच्या भूमिकेची प्रशंसा केली. महिला आर्थिक व्यवहारात पारदर्शकता आणतात, हे जागतिक स्तरावर सिद्ध झाले आहे. २५ टक्के सीए विद्यार्थी महिला असल्याचे ऐकून आनंद होतो. बहुतेक सीए वाईट नाहीत तर काही वाईट सीए व्यवसायात अनैतिकता आणू शकतात. बऱ्याचदा सीएंनी जारी केलेली प्रमाणपत्रे चुकीची आहेत. अशा अनैतिक पद्धतीचे अनुसरण सीएंनी करू नये. लोकमतने पॉन्झी योजना चालविणाºयांचा पर्दाफाश केला आणि ते सर्व तुरुंगात आहेत.
जयदीप शाह म्हणाले, विद्यार्थ्यांनी सीए कोर्समध्ये सातत्य ठेवावे, परिश्रम घ्यावे, आत्मविश्वास निर्माण करावा आणि आव्हानात्मक परिस्थितीत यशस्वी सीए बनण्यासाठी मनाचा समतोल साधावा. निहार जांबुसरिया म्हणाले, आयसीएआयने व्हर्च्युअल क्लासेस व ई-लर्निंग पद्धत दाखल केली असून ही पद्धत विद्यार्थ्यांना वेगाने बदलत असलेल्या तंत्रज्ञानाशी सांगड घालून उत्तम सीए बनविण्यास सक्षम आहे. अभिजित केळकर म्हणाले, पाठ्यपुस्तक आणि वर्गखोल्या या ज्ञान आणि कौशल्याचा भाग असून व्यावहारिक अनुभव परिपूर्ण बनविते. जितेंद्र सागलानी यांनी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास बळावण्यासाठी आयसीएआयचे अभ्यास मंडळ अभ्यासक्रमात विविध बदल करीत असल्याचे सांगितले.
उमंग अग्रवाल म्हणाले, सीएंनी व्यवसायात विश्वासार्हता टिकवून ठेवण्याची गरज आहे. परिषदेचे आयोजन करण्यासाठी नागपूर शाखेला मिळालेला हा सन्मान आहे. यावेळी विजय दर्डा यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सीए संस्थेचे माजी अध्यक्ष संदीप जोतवानी यांनी दर्डा यांना आणि माजी अध्यक्ष सीए स्वप्निल घाटे यांनी सीए जयदीप शाह यांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित केले. संचालन आर. ऐश्वर्या व सुदर्शन दिवाणजी यांनी केले. सीए किरीट कल्याणी यांनी आभार मानले. यावेळी आरसीएमचे माजी सदस्य सीए जुल्फेश शाह व सीए जेठालाल रुखियाना, नागपूर सीए संस्थेच्या माजी अध्यक्षा कीर्ती लोया, नागपूर विकासा कोषाध्यक्ष योगेश अडवाणी, सहसचिव उदित चोईथानी, त्रिशिका शाहू व रिषिका नारंग आणि सीए विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचा मंगळवारी समारोप झाला. यात सत्रनिहाय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
सीए उपसर्ग लावण्यासाठी दर्डा यांनी सुचविले
सुमारे दोन दशकापूर्वी चार्टर्ड अकाऊंटंटच्या नावाआधी सीए उपसर्ग लावण्याची दर्डा यांची सूचना आयसीएआयने स्वीकारली. तेव्हापासून सीए उपसर्ग लावण्यात येत असल्याचे शाह भाषणात म्हणाले.