चातुर्मासाला मुनीश्रींच्या नगरप्रवेशाने प्रारंभ

By Admin | Published: July 18, 2015 03:06 AM2015-07-18T03:06:15+5:302015-07-18T03:07:40+5:30

आजपासून चातुर्मासाला प्रारंभ झाला. मुनीश्री प्रसन्नसागर महाराज यांच्या नगरप्रवेशाने आणि महाराजांच्या उपदेशाने भाविकांचा...

Chaturmasala started by munisri town | चातुर्मासाला मुनीश्रींच्या नगरप्रवेशाने प्रारंभ

चातुर्मासाला मुनीश्रींच्या नगरप्रवेशाने प्रारंभ

googlenewsNext

सूर्यनगरातून काढण्यात आली भव्य शोभायात्रा : मुनीश्री प्रसन्नसागर यांचे प्रवचन
नागपूर : आजपासून चातुर्मासाला प्रारंभ झाला. मुनीश्री प्रसन्नसागर महाराज यांच्या नगरप्रवेशाने आणि महाराजांच्या उपदेशाने भाविकांचा आजचा चातुर्मासाचा प्रथम दिवस पावित्र्याने भारला होता. याप्रसंगी दिगंबर जैन मंदिरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. संभवनाथ जैन मंदिरात शोभायात्रा आल्यावर मंदिरातर्फे शोभायात्रेचे आणि प्रसन्नसागर महाराजांचे भव्य स्वागत करण्यात आले. बँडपथक, भजन, कीर्तनादी संकीर्तन करीत यात भाविक सहभागी झाले होते.
शोभायात्रेत हत्ती, घोडे, लेझिम पथक आदींचाही सहभाग होता. लकडगंज येथे शोभायात्रा पोहोचल्यावर जय झांझरी, राजकुमार झांझरी, विजय झांझरी, प्रसाद सोनी कुटुंबातर्फे रथाचे पूजन करण्यात आले. रथाच्या समोर ११ घोडे आणि रथात मुनीश्री प्रसन्नसागर महाराज, मुनीश्री पीयूषसागर गुरुदेव विराजमान होते. यासह पुलक चेतना मंचचे मनोज बंड, निरंजन जैन, कमलकिशोर जैन आदी भाविक रथासोबत होते. संगीत रथ हे या शोभायात्रेचे विशेष आकर्षण होते. इतवारी परिसरात नगरसेवक आभा बिज्जू पांडे, महापौर प्रवीण दटके यांच्या उपस्थितीत महाराजांचे स्वागत करण्यात आले. महाराजांच्या या रथाचे प्रत्येक ठिकाणी भक्तीभावाने स्वागत करण्यात आले. चातुर्मास समितीतर्फे महाराजांचे स्वागत करण्यात आले. उद्योगपती अमितकुमार बडजात्या यांनी दीपप्रज्वलनाने शोभायात्रेला प्रारंभ केला.
याप्रसंगी आसाम, गुवाहाटी, आंध्र प्रदेश, बंगाल, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्रातील अनेक भक्तांनी मुनीश्रींना श्रीफळ भेट दिले. (प्रतिनिधी)
२३ जुलै रोजी मुनीश्री प्रसन्नसागर यांचा जन्मदिन
१९ जुलै रोजी पार्श्वप्रभू दिगंबर मोठे जैन मंदिर, इतवारी येथे सकाळी ८ वाजता मंगल प्रवचन आणि २१ जुलैपर्यंत नित्य प्रवचन होणार आहे. २३ जुलै रोजी अंतर्मना मुनीश्री प्रसन्नसागर गुरुदेव यांचा जन्मदिन जैन मंदिर, सदर येथे साजरा करण्यात येणार आहे.

चेहऱ्यावर हसू असेल तर जीवन सुखी
मुनीश्री प्रसन्नसागर महाराज
आपल्या जीवनात आनंद आणि चेहऱ्यावर हास्य असेल तरच आपले जीवन सुखी आहे. चांगले काम कराल तर चांगले फळ मिळेल आणि चांगले फळ मिळाले तरच चेहऱ्यावर हसू आणि समाधान दिसेल. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर हसू सहजपणे येत असेल तर जीवनात आनंद आहे, असे समजा, असा उपदेश मुनीश्री प्रसन्नसागर महाराज यांनी केला.
मुनी म्हणाले, भाविकांच्या शहरात मी अध्यात्म घेऊन आलो आहे. जागरण आणि आचरणाचा शंखनाद घेऊनच मी येथे आलो आहे. पैशांनी तुम्ही तत्कालिक सुखी व्हाल पण मी तुम्हाला पुण्याची कधीही न संपणारी श्रीमंती देण्यासाठी आलो आहे.
मुनीश्री पीयूषसागर म्हणाले, आपल्या जीवनाच्या रथाचा सारथी आपण संतांना केले तर जीवन कधीच भरकटणार नाही. ते योग्य मार्गाने समोर जाईल. याप्रसंगी आसामचे सुभाष चुड़ीवाल, कनक जैन, विजयवाडाचे संपत जैन, धन्यकुमार जैन, नंदुभैया बरडिया यांचा सत्कार अविनाश जोहरापूरकर यांनी केला. भाजपा शहर उपाध्यक्ष सुमत लल्ला, जैन नगरसेविका आभा पांडे, महापौर प्रवीण दटके, स्वागताध्यक्ष उद्योगपती संतोष पेंढारी, अध्यक्ष उद्योगपती नरेश पाटणी, संयोजक प्रकाश बोहरा, महामंत्री पंकज बोहरा, कार्याध्यक्ष राकेश पाटणी, प्रचार प्रसार प्रमुख हीराचंद मिश्रीकोटकर, प्रमोद बैद आदी गणमान्य उपस्थित होते. १८ जुलै रोजी सेनगण मंदिरात सकाळी ८ वाजता पाद्यपूजा व मंगल प्रवचन होणार आहे.

 

Web Title: Chaturmasala started by munisri town

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.