चोरट्या छाया-मायाची टोळी जेरबंद : ९० ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 12:22 AM2020-08-29T00:22:51+5:302020-08-29T00:26:52+5:30
ऑटोतील सहप्रवाशांचे दागिने लंपास करणाऱ्या एका टोळीचा बजाजनगर पोलिसांनी छडा लावला. या टोळीतील दोन महिला आणि त्यांचा ऑटोचालक साथीदार अशा तिघांना पोलिसांनी अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ऑटोतील सहप्रवाशांचे दागिने लंपास करणाऱ्या एका टोळीचा बजाजनगर पोलिसांनी छडा लावला. या टोळीतील दोन महिला आणि त्यांचा ऑटोचालक साथीदार अशा तिघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून सोन्याच्या दागिन्यांसह साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. छाया अनिल खोब्रागडे (वय ३४, रा. रामटेके नगर, अजनी), माया संजय चहांदे (वय ४०, महाकाली नगर, बेलतरोडी) आणि श्याम विठ्ठलराव मेश्राम (वय ४०) अशी आरोपींची नावे आहेत. स्वावलंबी नगरातील रहिवासी मंगेश ठेंगडी ३१ जुलैला दुपारी बँकेत गेले होते. त्यांनी गणेश आणि महालक्ष्मीपूजनानिमित्त बँकेतून दागिने काढले आणि ते एका बॅगमध्ये ठेवून आरोपी श्याम मेश्राम याच्या ऑटोतून घराकडे निघाले. ऑटोमध्ये आरोपी छाया आणि माया आधीच बसून होत्या. त्यांनी संधी साधून ठेंगडी यांचे दागिने लंपास केले. त्यानंतर त्यांना एका रेडिमेड गारमेंटच्या दुकानासमोर सोडून दिले. महिलांना सोडून हॉस्पिटलमधून काही वेळात परत येतो असे सांगून आरोपी श्याम मेश्राम छाया आणि मायाला घेऊन निघून गेला. बनियन खरेदी केल्यानंतर त्याला पैसे देण्यासाठी ठेंगडी यांनी बॅगमध्ये हात टाकला तेव्हा दागिने चोरी गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी बजाजनगर पोलिस ठाण्यात या प्रकरणाची तक्रार नोंदविली. पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार महेश चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सीसीटीव्हीचा धागा धरून आरोपींचा शोध सुरू केला. या गुन्ह्यात वापरलेला ऑटो खापा पोलिसांनी जप्त केल्याची माहिती कळताच बजाजनगर पोलिसांनी ऑटोचालकाचे नाव शोधले. त्यानंतर २२ ऑगस्टला आरोपी मेश्रामला पोलिसांनी अटक केली. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे छाया आणि मायालाही पकडले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून पोलिसांनी ९० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि ऑटो असा एकूण चार लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
१५ गुन्हे दाखल
पोलिसांनी अटक केलेली केलेली छाया खोब्रागडे या टोळीची सूत्रधार आहे. तिच्याविरुद्ध विविध पोलिस ठाण्यात १५ पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. या टोळीने आणखी कोणते गुन्हे दाखल केले त्याची ठाणेदार महेश चव्हाण, निरीक्षक वर्षा देशमुख, गोविंदा बारापत्रे, संजय ठाकूर, नायक गौतम रामटेके, अमित गिरडकर, सुरेश वरुळकर आणि रेणू पांडे हे चौकशी करीत आहेत.