नागपुरात लसणाची फोडणी स्वस्त! ठोक भाव ५० ते ७० रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 08:22 PM2020-05-13T20:22:42+5:302020-05-13T20:25:01+5:30
एका महिन्यापूर्वी किरकोळमध्ये १५० ते १६० रुपये किलोवर पोहोचलेले लसणाचे भाव सध्या आवक वाढल्याने ९० ते १०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. कळमना ठोक बाजारात ५० ते ७० रुपये भाव आहेत, हे विशेष. भाव कमी झाल्याने लसणाची फोडणी स्वस्त झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एका महिन्यापूर्वी किरकोळमध्ये १५० ते १६० रुपये किलोवर पोहोचलेले लसणाचे भाव सध्या आवक वाढल्याने ९० ते १०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. कळमना ठोक बाजारात ५० ते ७० रुपये भाव आहेत, हे विशेष. भाव कमी झाल्याने लसणाची फोडणी स्वस्त झाली आहे.
तीन महिन्यांपूर्वी लसूण २०० ते २२० रुपये किलोवर गेला होता. जास्त पावसामुळे पीक खराब झाल्यानंतर आवक कमी झाली होती. भाव वाढल्यानंतर गृहिणींनी लसणाला स्वयंपाकघरातून दूर केले होते. गेल्या काही दिवसांपासून मध्य प्रदेशातून म्हणजेच छिंदवाडा आणि अन्य जिल्ह्यांतून कळमन्यात लसणाचे एक-दोन ट्रक दररोज येत आहेत. भाव कमी झाल्याने आवकीच्या तुलनेत विक्री वाढली आहे. नवीन उत्पादनाची आवक बाजारात सुरू होताच भावात घसरण होऊ लागली. पण सध्या आवक वाढल्याने भाव कमी झाले आहेत. कळमना आलू-कांदे, लसूण अडतिया असोसिएशनचे माजी अध्यक्ष जयप्रकाश वसानी म्हणाले, कोरोनामुळे प्रशासनाने आलू-कांदे आणि लसूण बाजार रविवार, सोमवार आणि बुधवार असे तीन दिवसच भरत आहे. त्या प्रमाणात आवक आहे. बाजार नियमित सुरू झाल्यास भाव कमी होण्याची शक्यता आहे.