१८ महिन्यात मिळणार स्वस्त घर
By admin | Published: December 31, 2016 03:01 AM2016-12-31T03:01:08+5:302016-12-31T03:01:08+5:30
एकीकडे नागपूर सुधार प्रन्यासला (नासुप्र) बरखास्त करण्यास राज्य सरकारने तत्त्वत: मंजुरी दिली आहे.
नासुप्र करणार पंतप्रधान घरकुल योजनेचे भूमिपूजन :झोपड्यांचे पट्टे वितरण, १० एसटीपीची कामेही सुरू होणार
नागपूर : एकीकडे नागपूर सुधार प्रन्यासला (नासुप्र) बरखास्त करण्यास राज्य सरकारने तत्त्वत: मंजुरी दिली आहे. तर दुसरीकडे या निर्णयाने न घाबरता नासुप्रने विकास कामांची घोषणा केली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नासुप्र पंतप्रधान घरकुल योजनेंतर्गत १२६८ फ्लॅटच्या प्रकल्पाचे भूमिपूजन करणार आहे. पंतप्रधान घरकुल योजनेवर काम सुरु करणारी नासुप्र ही देशभरातील पहिली संस्था असेल. यासोबतच जे काम सुरू केले जाईल, ते पूर्ण सुद्धा करण्यात येईल. १८ महिन्यात पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होईल. येत्या तीन वर्षात हा प्रकल्प पूर्ण केला जाईल, असा विश्वास नासुप्रचे सभापती डॉ. दीपक म्हैसेकर यांनी व्यक्त केला आहे.
पत्रकारांशी चर्चा करतांना डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले की, १ जानेवारी रोजी घरकुल योजनेसह १० सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी)चे भूमिपूजन, झोपडपट्ट्यांचे पट्टे वितरण आणि झुलेलाल स्पोटर््स सेंटर, बिनाकी येथे स्विमिंग पुलचेही लोकार्पण केले जाणार आहे. ‘कॅशलेस पेमेंट’ योजनेवरील अमलही याच दिवशी केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
म्हैसेकर यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत देशात सर्वांसाठी घर बनवून देण्याचा संकल्प केला आहे. तो संकल्प पूर्ण करण्यासाठी नासुप्रने पाऊल उचलले आहे. राज्यात नासुप्र ही पहिलीच संस्था जी या प्रकल्पावर काम सुरू करीत आहे. १५ महिन्यात १२६८ स्वस्त फ्लॅट निर्माण केले जातील. त्यानंतर काही जमिनींचे आरक्षण बदलल्यानंतर १५,१९६ फ्लॅटची घरकुल योजना तयार केली जाईल. नासुप्र, मनपा, म्हाडा मिळून शहरात ५० हजार घर बनवणार आहे. नासुप्र पहिल्या टप्प्यात वाठोडा येथे ०.८५ हेक्टर जमिनीवर ३०८ ईडब्ल्यूएस वर्गाची फ्लॅट स्कीम तयार करीत आहे. यावर ३६.२४ कोटी रुपये खर्च केले जातील.
तसेच मौजा वांजरी येथे २.४५३ हेक्टर जमिनीवर ९६० फ्लॅट आणि १२ कमर्शियल गाळे तयार केले जातील. यावर ९३.५२ कोटी रुपये खर्च होण्याचा अंदाज आहे. यात ३२३ वर्ग फुट क्षेत्रात फ्लॅट राहतील. तळमजल्यासह चार माळे राहतील. ही योजना सौर ऊर्जेवर आधारित तयार केली जाणार आहे. (प्रतिनिधी)