भर उन्हाळ्यातही भाज्या स्वस्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:08 AM2021-04-22T04:08:37+5:302021-04-22T04:08:37+5:30
नागपूर : दरवर्षी एप्रिल महिन्यात भाज्यांच्या किमती वाढत असल्याचा गृहिणींना अनुभव आहे. पण यंदा एप्रिल महिन्यातही स्थानिक शेतकरी आणि ...
नागपूर : दरवर्षी एप्रिल महिन्यात भाज्यांच्या किमती वाढत असल्याचा गृहिणींना अनुभव आहे. पण यंदा एप्रिल महिन्यातही स्थानिक शेतकरी आणि अन्य जिल्ह्यातून भाज्यांची आवक वाढल्याने भाज्यांचे भाव आटोक्यात आहेत. पुढील १० ते १५ दिवस भाज्यांची स्वस्ताई राहणार असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
आठवडी बाजार बंद आहे, पण गल्लीबोळात आणि सकाळच्या सत्रात रस्त्याच्या कडेला भाज्यांची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे लोकांची खरेदी दुपार व सायंकाळऐवजी सकाळीच होऊ लागली आहे. त्यामुळे विक्रेतेही खूश आहे. पण आता सकाळी ११ पर्यंत भाज्यांची दुकाने सुरू राहत असल्याने गल्लीबोळात हातठेल्यावर भाज्यांची विक्री होत असल्याचे दिसून येत आहे. याशिवाय भाज्या विक्रेत्यांवर कारवाईही होत नाही. कॉटन मार्केट आणि कळमन्यातील भाजी बाजार सकाळी ९ पर्यंत सुरू असल्याने किरकोळ विक्रेते पहाटेच भाज्यांची खरेदी करतात. आवक वाढल्याने भाज्यांचे भाव कमी असल्याची माहिती महात्मा फुले भाजी बाजार आडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी दिली. मनपाने कॉटन मार्केट परिसरात कोरोना चाचणीचे शिबिर लावल्याने अनेकजण चाचणी करीत असल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले. सध्या खाद्यतेल महाग आहे, पण भाज्या स्वस्त असल्याने गृहिणींना दिलासा मिळाला आहे. हिरवी मिरची रायपूर, परतवाडा आणि मौदा येथून विक्रीला येत असल्याने महाग आहे.
किरकोळ बाजारात भाज्यांचे किलो भाव :
वांगे १२ ते १५ रुपये, फूल कोबी १५ ते २०, पत्ता कोबी २०, टोमॅटो १५ ते २०, हिरवी मिरची ३० ते ३५, कोथिंबीर २५ ते ३०, चवळी शेंग २० ते २५, गवार ३०, ढेमस ३० ते ४०, तोंडले २५ ते ३०, दोडके ४०, पालक भाजी१०, मेथी ३०, चवळी २०, कोहळ २५ ते ३०, फणस ३० ते ४०, काकडी १२ ते १५, मूळा १२ ते १५, गाजर २० ते २५ रुपये.