व्हिजन फिशरिजचे स्वप्न दाखवून अनेकांना चुना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 11:10 PM2021-07-23T23:10:53+5:302021-07-23T23:11:18+5:30

Fraud मत्स्यपालनाच्या व्यवसायातून महिन्याला लाखोंचा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवून दोन भामट्यांनी मुंबईतील एका अभियंत्यासह ठिकठिकाणच्या व्यावसायिकांना कोट्यवधींचा गंडा घातला.

Cheat to many by showing the dream of Vision Fisheries | व्हिजन फिशरिजचे स्वप्न दाखवून अनेकांना चुना

व्हिजन फिशरिजचे स्वप्न दाखवून अनेकांना चुना

Next
ठळक मुद्देमुंबईच्या अभियंत्याची तक्रार - सीताबर्डीत गुन्हा दाखल - आर्थिक गुन्हे शाखेकडून चाैकशी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - मत्स्यपालनाच्या व्यवसायातून महिन्याला लाखोंचा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवून दोन भामट्यांनी मुंबईतील एका अभियंत्यासह ठिकठिकाणच्या व्यावसायिकांना कोट्यवधींचा गंडा घातला. राजेश ताराचंद बनसोड (वय ४४, रा. श्री ओम अपार्टमेंट, कामठी) आणि राजेंद्र वाघमारे (वय ४५), अशी आरोपींची नावे आहेत. गुरुवारी त्यांच्याविरुद्ध सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

बनसोड याने रामदासपेठेतील जैन मंदिराजवळच्या एस. हाईटस् या इमारतीत फॉर्च्यून फिशरिज व्हिजन आणि फॉर्च्यून ॲक्वा नावाने कंपनीचे कार्यालय सुरू केले होते. केज कल्चरच्या माध्यमातून मत्स्यपालन केल्यास महिन्याला लाखोंचा लाभ मिळतो, असा दावा बनसोड करायचा. त्याच्याकडे व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेला वाघमारेही संपर्क करणाऱ्यांना असेच सांगायचा. १० ऑगस्ट २०१७ ला नवी मुंबईतील अभियंता

ध्रुव सघुवंश सक्सेना (वय ४४) यांनी त्यांच्याशी संपर्क साधून विचारणा केली असता आरोपींनी उपरोक्त थापेबाजी केली. प्रभावित झालेल्या सक्सेना आणि अन्य पाच जणांनी आरोपींकडे १ कोटी १४ लाख ७२ हजार १५० रुपये जमा केले. सुरुवातीला चार महिने आरोपींनी या गुंतवणूकदारांना पेआऊटच्या माध्यमातून काही रक्कम परत केली. जानेवारी २०१८ पासून आरोपींनी वेगवेगळे कारण सांगून रक्कम परत करणे थांबविले. रक्कम परत मिळेल, या आशेमुळे तब्बल साडेतीन वर्षे आरोपींच्या बनवाबनवीवर सक्सेना आणि अन्य गुंतवणूकदारांनी विश्वास ठेवला. मात्र, ते रक्कम परत करणार नाही, याची खात्री पटल्याने स्थानिक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदविली. आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पूर्ण करून अधिकाऱ्यांनी गुरुवारी या प्रकरणात आरोपी बनसोड आणि वाघमारेविरुद्ध सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. आरोपी फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

विना परवानगीचे नेटवर्क सर्वत्र

दुसऱ्यांकडून ठेवी स्वीकारायच्या असेल तर आरबीआयच्या नियमानुसार परवानगी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी एनबीएफसीचा परवानाही आवश्यक आहे. मात्र, आरोपींनी आपले फसवणुकीचे नेटवर्क विस्तारण्यासाठी कसलाही परवाना अथवा परवानगी घेतली नाही. दाखल झालेल्या गुन्ह्यात मुंबई, मेरठसह वेगवेगळ्या शहरातील लब्धप्रतिष्ठितांचा समावेश आहे. आरोपींनी आणखी कुणाकुणाची फसवणूक केली, त्याचाही पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: Cheat to many by showing the dream of Vision Fisheries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.