फेक प्रोफाईलआधारे नागपुरात महिलेची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 11:51 AM2019-03-25T11:51:51+5:302019-03-25T11:54:13+5:30
सोशल मीडियावर स्वत:ची फेक प्रोफाईल तयार केल्यानंतर एका घटस्फोटीत महिलेला आपल्या जाळ्यात ओढून आरोपी अरुण आनंदराव मौदेकर (वय ५४) याने तिचे शारीरिक शोषण केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सोशल मीडियावर स्वत:ची फेक प्रोफाईल तयार केल्यानंतर एका घटस्फोटीत महिलेला आपल्या जाळ्यात ओढून आरोपी अरुण आनंदराव मौदेकर (वय ५४) याने तिचे शारीरिक शोषण केले. सात महिन्यानंतर त्याची बनवाबनवी उघड झाल्याने महिलेने त्याच्याविरोधात तक्रार नोंदवली. परिणामी धंतोली पोलिसांनी आरोपी मौंदेकरविरुद्ध गुन्हा दाखल करून शनिवारी रात्री त्याला अटक केली.
आरोपी मौंदेकर जागनाथ बुधवारी परिसरात राहतो. तो अर्जनविस (दस्तलेखक) आहे. तो विवाहित असून, त्याला दोन मोठी मुले आहेत. तक्रारदार महिला वैशाली (वय ४३) हीसुद्धा घटस्फोटीत आहे. २००८ मध्ये ती पतीपासून वेगळी झाली. तिला १८ वर्षांचा मुलगा आहे. ती वृद्ध आईवडिलांच्या घरी राहते. तिला आधार मिळावा म्हणून तिच्या वृद्ध आईवडिलांनी तिच्यामागे लग्नाचा तगादा लावला होता. परिणामी तिने जीवनसाथी डॉट कॉमवर तिचे प्रोफाईल अपलोड केले होते. आरोपी अरुण मौंदेकर अर्जनविस असल्यामुळे बनावट कागदपत्रे कशी तयार करायची, हे त्याला चांगले माहिती आहे. वैशालीचे प्रोफाईल बघून त्याने स्वत:चे बनावट प्रोफाईल तयार करून ते जीवनसाथी डॉट कॉमवर अपलोड केले. त्या माध्यमातून वैशालीसोबत त्याने संपर्क साधला. आपली पत्नी मरण पावली असून, दुसरे लग्न करायचे आहे, असे म्हणत त्याने वैशालीला गेल्या वर्षी प्रपोज केले. तिला खात्री पटावी म्हणून धंतोलीच्या गणेशसागर रेस्टॉरेंटमध्ये ४ सप्टेंबर २०१८ ला भेटायला बोलविले. तेथे तिला त्याने पत्नीचे बनावट मृत्यू प्रमाणपत्र दाखविले. स्वत:ची बनावट पारिवारिक माहिती दिली.
आपण एका राजकीय पक्षात मोठ्या पदावर आहो, असे सांगूनही वैशालीला प्रभावित केले. तिच्याशी लग्न केले आणि लग्नाचे बनावट शपथपत्रही बनविले. लग्नाच्या वेळी त्याच्या कुटुंबातील कुणीच सदस्य हजर नव्हते. लग्नानंतर त्याने तिला आपल्या घरी नेलेच नाही. वेगवेगळी कारणे सांगून तो तिला घरी नेण्याचे टाळत होता. वैशालीच्या आईवडिलांकडे तसेच इकडे तिकडे नेऊन त्याने तिच्यासोबत तब्बल सात महिने शरीरसंबंध जोडले.
अनेकींची फसवणूक?
आरोपी अत्यंत धूर्त असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी प्राथमिक चौकशीतून काढला आहे. बनावट कागदपत्रे तयार करण्यात तो सराईत आहे. त्याची एकूणच मनोवृत्ती बघता त्याने अशाच प्रकारे आणखी काही महिलांची फसवणूक केली असावी, असा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे पोलीस त्याची कसून चौकशी करीत आहेत.
दरम्यान, त्याने वैशालीची फसवणूक करण्यासाठी बनविलेल्या कागदपत्रानुसार शासकीय यंत्रणेचीही फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध दुसरा गुन्हाही दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अखेर पितळ उघडे
घरी नेण्याचे नाव घेताच तो तिला टाळत होता. प्रत्येक वेळी तो विसंगत माहिती देत असल्याने वैशालीला संशय आला. ७ मार्चला दुपारी तिने त्याचा पाठलाग केला आणि तिला प्रचंड धक्का बसला. तो विवाहित आहे, त्याला पत्नी आणि दोन तरुण मुले आहेत. त्याने दिलेली संपूर्ण माहिती खोटी असल्याचे तिला कळले. त्यामुळे तिने धंतोली ठाण्यात तक्रार अर्ज दिला. पीएसआय गोळे यांनी चौकशी केल्यानंतर आरोपीने केवळ शरीरसंबंध जोडण्यासाठी तिला आपल्या जाळ्यात ओढून तिची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांनी दिलेल्या चौकशी अहवालावरून हवलदार दिनेश ठाकरे यांनी आरोपी अरुण मौंदेकरविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून शनिवारी रात्री त्याला अटक केली.