नागपुरातील आयडीबीआय बँकेला पावणेदोन कोटींचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 12:40 AM2018-11-20T00:40:59+5:302018-11-20T00:46:19+5:30
बनावट कागदपत्रांच्या आधारे पीक कर्ज प्रकरण तयार करून आयडीबीआय बँकेला १ कोटी ७४ लाखांचा गंडा घालणाऱ्या १६ आरोपींविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्यातील १२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तब्बल पाच वर्षांनंतर गुन्हा दाखल करून अटक करण्याची ही घडामोड झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बनावट कागदपत्रांच्या आधारे पीक कर्ज प्रकरण तयार करून आयडीबीआय बँकेला १ कोटी ७४ लाखांचा गंडा घालणाऱ्या १६ आरोपींविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्यातील १२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तब्बल पाच वर्षांनंतर गुन्हा दाखल करून अटक करण्याची ही घडामोड झाली.
राजेश कोठीराम गुहे, संतोष बजरंग नंदागवळी, अनिल हिरामण घोडे, सारंग अशोकराव चिटकुले, रामाजी कौडूजी भेंडे, जसवंतसिंग बलबीरसिंग प्रधान, पतिराम बाबुलाल बावनकर, लखनलाल चंदनलाल राठोड, योगिराज बालकिशन बिटले, सचिन अशोकराव चिटकुले, प्रशांत पुंडलिकराव बोरकर, मंजितसिंग बलबीरसिंग प्रधान, योगिराज आदे, अनुपसिंग बलवंतसिंग प्रधान आणि विकास मधुकर काकडे अशी फसवेगिरी करणाऱ्या आरोपींची नावे आहेत.
कळमन्यातील प्रशांत बोरकर हा या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचे सांगितले जाते. त्याने बँकेला चुना लावण्याचा कट पाच वर्षांपूर्वी रचला. त्यानुसार २०१३ मध्ये त्याने मानकापुरात (गोधनी) आयडीबीआयच्या शाखेत ७/१२, पत प्रमाणपत्र, गहाणपत्र अशी बनावट कागदपत्रे सादर करून उपरोक्त साथीदारांच्या मदतीने १६ कर्ज प्रकरणे सादर केली. २०१३-१४ मध्ये बँकेच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची तपासणी करून त्यांना १ कोटी ३५ लाख ९ हजार ९७५ रुपयांचे कर्ज दिले. दरम्यान, कर्ज उचलल्यानंतर परतफेडीचे हप्ते येत नसल्याने बँकेच्या अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली असता या १६ च्या १६ ही प्रकरणात बनावट कागदपत्रे सादर करून फसवणूक करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.
त्यामुळे बँकेतर्फे गुन्हे आर्थिक शाखेत तक्रार नोंदवण्यात आली. कर्जाची रक्कम आणि व्याजासह बँकेला १ कोटी ७३ लाख ८० हजारांचा गंडा घालण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले. गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणाची कसून चौकशी केली असता यातील सूत्रधाराने शेतमजुरी करणाऱ्यांना बनावट कागदपत्रांच्या आधारे शेतकरी बनवून कर्ज लाटल्याचेही उघड झाले. त्यामुळे सोमवारी बँक व्यवस्थापक प्रदीपकुमार भालचंद्र लघाटे यांच्या तक्रारीवरून मानकापूर ठाण्यात गुन्हा दाखल करून १६ पैकी १२ जणांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर करून त्यांचा २३ नोव्हेंबरपर्यंत पीसीआर मिळविण्यात आला.
अनेकांची भूमिका संशयास्पद
या कर्ज घोटाळ्यात पटवाऱ्यापासून बँक अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांची भूमिका संशयास्पद आहे. त्यांचीही पोलीस गुप्त चौकशी करीत आहेत. आरोपींची संख्या वाढू शकते, असेही अधिकाऱ्यांचे मत आहे. दरम्यान, या प्रकरणात मंजितसिंग प्रधान, योगिराज आदे, अनुपसिंग प्रधान आणि विकास काकडे फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.