शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकीचे जाळे, सेवानिवृत्त अभियंत्याला १.४३ कोटींचा गंडा
By योगेश पांडे | Published: April 5, 2024 09:27 PM2024-04-05T21:27:32+5:302024-04-05T21:28:24+5:30
सायबर गुन्हेगारांनी अभियंत्याला कथित एपेक्स सोलर कंपनीच्या आयपीओबद्दल सांगितले आणि त्यात गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल असे सांगितले.
नागपूर : शेअर बाजारात गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने सायबर गुन्हेगारांनी एका सेवानिवृत्त अभियंत्याला तब्बल १.४३ कोटी रुपयांनी गंडा घातला. ६३ वर्षीय पीडित अभियंता गिट्टीखदान येथील रहिवासी आहेत.
ते परदेशात नोकरी करत होते. निवृत्तीनंतर ते कुटुंबासह नागपुरात परतले. ते अधिकृतपणे शेअर बाजारात गुंतवणूक करत होते. ७ जानेवारी रोजी एका अज्ञात सायबर गुन्हेगाराने त्याला जास्त नफा देण्याचे आमिष दाखवून व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जोडले. त्या ग्रुपमध्ये आधीच १०० लोक होते. ग्रुपमध्ये सामील झाल्यापासून मिळालेल्या नफ्याचा अनुभव इतर सदस्यांनी शेअर केला. हे पाहिल्यानंतर अभियंत्यालाही नफा मिळविण्याची इच्छा झाली. एस रामजी नावाच्या व्यक्तीने त्यांना गुंतवणुकीचे मार्ग सांगायला सुरुवात केली. यावर विश्वास ठेवून अभियंत्याने सुरुवातीला अल्प रक्कम गुंतवली. त्यावर त्यांना नफाही देण्यात आला. त्यामुळे त्यांचा विश्वास वाढला.
सायबर गुन्हेगारांनी अभियंत्याला कथित एपेक्स सोलर कंपनीच्या आयपीओबद्दल सांगितले आणि त्यात गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल असे सांगितले. अभियंत्याने गुंतवणूक करण्यास सुरुवात केली तेव्हा त्याला डमी खात्यात नफा कमावल्याचेही दाखविण्यात आले. ७ जानेवारी ते १ एप्रिल दरम्यान त्यांनी १.४३ कोटी रुपये आरोपींनी दिलेल्या बॅंक खात्यात ट्रान्सफर केले. २६ मार्च रोजी त्यांना जमा केलेली रक्कम कमी झाल्याचे ॲपमध्ये दिसले. त्यांनी ग्रुपमध्ये विचारणा केली असता ३१ मार्च नंतर त्यांचा क्रेडिट स्कोअर आपोआप वाढेल असे खोटे आश्वासन देण्यात आले. १ एप्रिल रोजी त्यांच्या ॲपवर लॉगिन झालेच नाही. यानंतर त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणूक आणि आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. अलीकडे शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणुकीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. सुशिक्षित लोकच बळी पडत आहेत.