बनावट फर्म काढून नागपुरात पापड विक्रेत्याला लावला चुना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 02:19 PM2018-02-06T14:19:29+5:302018-02-06T14:19:59+5:30
बनावट फर्मची स्थापना करून नागपुरात एका पापड विक्रेत्याला आरोपी विनोद कल्याणी याने अडीच लाखांचा चुना लावला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बनावट फर्मची स्थापना करून नागपुरात एका पापड विक्रेत्याला आरोपी विनोद कल्याणी याने अडीच लाखांचा चुना लावला. फिर्यादी अनिल सुदर्शन खुंगर (वय ३६, माउंट रोड) यांचा एमआयडीसीत थ्रीडी पापड तयार करण्याचा कारखाना आहे. २५ जानेवारीला दुपारी ३.३० वाजता अनिल खूंगर यांना विनोद कल्याणीचा फोन आला. आपण जय माता दी एजन्सी भवानी माता मंदीरजवळ पारडी, कळमना येथून बोलतो, असे त्याने सांगितले. यावेळी कल्याणीने खूंगर यांच्याकडून थ्रीडी पापडाचे ३०० बॉक्स मागवून घेतले. त्या बदल्यात खूंगर यांना कल्याणीने शिक्षक सहकारी बँकेचा धनादेश दिला. २ लाख, ५२ हजार रुपयांचा हा धनादेश खूंगर यांनी त्यांच्या खात्यात जमा केला असता तो बाऊन्स झाला. त्यानंतर खूंगर यांनी कल्याणी तसेच त्याच्या फर्मचा शोध घेतला असता त्या पत्त्यावर अशी कोणतीही फर्म नसल्याचे उघड झाले. कल्याणीने जाणीवपूर्वक फसवणूक केल्याचे लक्षात आल्यामुळे खूंगर यांनी एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.