सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना गंडा : खोट्या सह्या करून काढले लाखो रुपये
By योगेश पांडे | Updated: November 10, 2022 21:20 IST2022-11-10T21:16:02+5:302022-11-10T21:20:11+5:30
आयटी व्यवस्थापक, हार्डवेअर इंजिनिअरकडून बॅंकेची फसवणूक

सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना गंडा : खोट्या सह्या करून काढले लाखो रुपये
नागपूर : सेंट्रल बॅंक ऑफ इंडियातील आयटी व्यवस्थापक तसेच आऊटसोर्स केलेल्या कंपनीतील हार्डवेअर इंजिनिअरने बॅंक व ग्राहकांची २० लाखांनी फसवणूक केली. दोघांनी एका सफाई कर्मचाऱ्याच्या मदतीने ग्राहकांच्या खोट्या सह्या करून ही रक्कम विविध खात्यातून काढली. हा प्रकार लक्षात येताच बॅंकेकडून तक्रार करण्यात आली व पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा नोंदविला आहे.
सतीश खंगार (४४, आयटी व्यवस्थापक), राहुल सुर्यवंशी (३२, हार्डवेअर इंजिनिअर) व आशीष वाढवे (३२, सफाई कर्मचारी) अशी आरोपींची नावे आहे. सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाकडून पुण्यातील एका कंपनीसोबत हार्डवेअरबाबत करार करण्यात आला आहे. राहुल त्या कंपनीचा निवासी प्रतिनिधी आहे. १५ सप्टेंबर रोजी एका महिला ग्राहकाने तिच्या खात्यातून कुणीतरी साडेचार लाख रुपये परस्पर काढण्याची तक्रार केली व त्यानंतर बॅंकेने अंतर्गत चौकशी सुरू केली.
त्यातून हा प्रकार समोर आला. या तिनही आरोपींनी काही ग्राहकांच्या खोट्या सह्या करून बॅंकेतून २० लाख ८८ हजार रुपयांची रक्कम काढली. सफाई कर्मचारी असलेल्या आशीषला हाताशी धरून त्यांनी इंग्लंडमध्ये राहणाऱ्या एका महिलेच्या खात्यातून चार लाख रुपये काढले. सीसीटीव्हीतून ही बाब समोर आली. १३ जून २०२२ ते ५ सप्टेंबर २०२२ या कालावधीत फसवणूकीचा हा प्रकार समोर होता. बॅंकेचे मुख्य व्यवस्थापक समीर घोरमाडे यांच्या तक्रारीवरून सदर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.