बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक
By admin | Published: January 2, 2017 02:34 AM2017-01-02T02:34:36+5:302017-01-02T02:34:36+5:30
बनावट कागदपत्रे तयार करून लाखोंची जमीन विकण्याचा डाव थोडक्यात हुकला.
जमीन दुसरीचीच : भलतीच महिला बनली मालकीण
नागपूर : बनावट कागदपत्रे तयार करून लाखोंची जमीन विकण्याचा डाव थोडक्यात हुकला. जमिनीचा सौदा करणाऱ्याने मूळ जमीन मालकिणीशी संपर्क साधल्याने त्रिकुटाची बनवाबनवी उघड झाली. त्यानंतर पोलिसांनी या त्रिकुटावर गुन्हाही दाखल केला. गोधनी, झिंगाबाई टाकळी येथे राहणाऱ्या हिना जयराम कोल्हे यांची लाखो रुपये किमतीची जमीन आहे.
आरोपी चंदशेखर धर्मदास बाळबुधे (रा. नंदनवन गल्ली नंबर ३), रतन वामन उके (वय २१, रा. वकीलपेठ, रेशीमबाग) आणि पवन दौलत ठाकरे (वय ३४, रा. नंदनवन) या तिघांनी ही जमीन हडपण्यासाठी कट रचला. त्यासाठी एका महिलेचीही साथ घेतली. आरोपींनी साथीदार महिलेचे बनावट मतदार ओळखपत्र तयार केले. त्या ओळखपत्राच्या आधारे साथीदार महिलेला अधिकाऱ्यांसमोर हजर केले.
हीच महिला हिना जयराम कोल्हे असल्याचे सांगून, आरोपींनी ८ डिसेंबर २०१५ च्या सायंकाळी सिव्हिल लाईनमधील दुय्यम निबंधक नोंदणी कार्यालयात आपल्या नावाने जमिनीचे आममुख्त्यारपत्र तयार केले. त्यानंतर ही जमीन विकण्याचे आरोपींनी प्रयत्न सुरू केले.
दरम्यान, सौदा करणाऱ्या व्यक्तीने कोल्हे यांच्याशी थेट संपर्क साधला तेव्हा ही बनवाबनवी उघड झाली. त्यानंतर कोल्हे यांनी सदर पोलिसांकडे तक्रार नोंदवली. (प्रतिनिधी)