कुलिंग चार्जच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक, २५ हजारांचा दंड वसूल; व्हॉट्सॲपद्वारे करा तक्रार
By मोरेश्वर मानापुरे | Published: April 30, 2024 12:37 AM2024-04-30T00:37:33+5:302024-04-30T00:37:55+5:30
गेल्यावर्षी एका कुलिंग चार्ज वसुली प्रकरणात एका कॅन्टिन चालकावर वैधमापन शास्त्र नागपूर विभागाने २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला होता.
नागपूर : उन्हाळ्यात नागपुरात पॅकबंद शीतपेय आणि थंड पाणी विकताना कुलिंग चार्जेसच्या नावाखाली विक्रेत्यांचा गोरखधंदा जोरात सुरू असून ग्राहकांचे हजारो रुपयांचे दररोज खिसे कापले जात आहेत. गेल्यावर्षी एका कुलिंग चार्ज वसुली प्रकरणात एका कॅन्टिन चालकावर वैधमापन शास्त्र नागपूर विभागाने २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला होता.
यासंदर्भात सदर प्रतिनिधीने बाजारपेठेची पाहणी केली. विक्रेत्याला पॅकबंद एक लिटर पाण्याची बॉटल कंपनीनुसार १० ते १२.५० रुपयात मिळते. विक्रेते थंड करून २० ते २५ रुपयांना विकतात. विजेचे दर परवडत नसल्याने जास्त दरात विकतो. बिल मागितले असता, २० रुपयांचे बिल मागता काय, असे उत्तर विक्रेत्याने दिले. हीच बाब शितपेयाच्या बाबतीतही दिसून आली. ग्राहक तक्रार करीत नसल्याने विक्रेत्यांचे फावत आहे.
..तर अतिरिक्त रक्कम द्यावी लागणार
कुलिंग चार्जेसह जास्त रक्कम का आकारता, असे विचारले असता, थंडी बॉटल हवी असल्यास अतिरिक्त रक्कम द्यावीच लागेल, असे स्पष्ट सांगितले. तसे पाहता शीतपेय व पाणी थंड करून विकण्याची तरतूद आहे. याकरिता कंपन्यांकडून व्यापाऱ्यांना आधीच सूट दिली जाते. त्यामुळे एमआरपीहून जास्त रक्कम विक्रेत्यांना घेता येत नाही. रेल्वे स्टेशन, बसस्टँड, रेस्टॉरंट, चहानाश्त्याची दुकाने आणि पान टपऱ्यांवर थंडच्या नावावर जास्त रकमेची वसुली सुरू आहे. नागपूर शहरात उन्हाळ्यात १ लाखाहून अधिक शीतपेयाच्या पॅकबंद बॉटल आणि तेवढ्याच एक लिटर पाण्याच्या बॉटल विकल्या जातात.
दुकानांची तपासणी मोहीम
सहनियंत्रक, वैधमापन शास्त्र, नागपूर विभागाने २ ते १० मे दरम्यान नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली शहर आणि ग्रामीण भागातील आइस्क्रीम व शीतपेय विक्रेते आणि उत्पादकांची तपासणी मोहीम हाती घेतल्याची माहिती वैधमापन शास्त्र नागपूर विभागीय कार्यालयाचे सहनियंत्रक पांडुरंग बिरादार यांनी दिली. अहवाल १३ मे रोजी सादर होणार असून त्याआधारे ही मोहीम आणखी तीव्र होईल. याकरिता ग्राहकांनी दुकान व परिसराचे नाव टाकून विभागाच्या ९४०४९५१८२८ या व्हॉट्स ॲप क्रमांकावर तक्रार करण्याचे आवाहन विभागाने केले आहे. ग्राहकाचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे.
२५ हजार रुपये दंड वसुली !
कुलिंग चार्जेच्या नावाखाली ग्राहकांकडून अतिरिक्त रक्कम वसूल करणे हा गुन्हाच आहे. गेल्या उन्हाळ्यात अतिरिक्त कुलिंग चार्जेच्या प्रकरणात सुनावणीदरम्यान एका कॅन्टिन चालकावर २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. सत्तार अब्दुल रज्जाक सय्यद असे कॅन्टिन चालकाचे नाव असून तो सावनेर, वाकी येथील द्वारका पार्कच्या कॅन्टिनचा चालक होता.
पांडुरंग बिरादार, सहनियंत्रक, वैधमापन शास्त्र, नागपूर विभागीय कार्यालय.