मनपाकडून दिव्यांगांची फसवणूक : दिव्यांगांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 11:54 PM2020-06-13T23:54:53+5:302020-06-13T23:56:33+5:30
स्वयंरोजगार अर्थसाहाय्य योजनेसाठी पात्र ठरलेल्या १३० दिव्यांगांची महापालिकेने फसवणूक केली आहे. प्रशिक्षण घेतल्यानंतरही स्वयंरोजगारासाठी अर्थसाहाय्य करण्यास समाजकल्याण विभागातर्फे टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप दिव्यांगांनी केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वयंरोजगार अर्थसाहाय्य योजनेसाठी पात्र ठरलेल्या १३० दिव्यांगांची महापालिकेने फसवणूक केली आहे. प्रशिक्षण घेतल्यानंतरही स्वयंरोजगारासाठी अर्थसाहाय्य करण्यास समाजकल्याण विभागातर्फे टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप दिव्यांगांनी केला आहे.
महापालिकेच्या समाजकल्याण विभागामार्फत २०१९-२० या वर्षात दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी अर्थसाहाय्य योजना राबविण्यात आली. या योजनेंतर्गत स्वयंरोजगारासाठी अर्थसाहाय्याकरिता अर्ज करणाऱ्यांपैकी पात्र ठरलेल्या १३० दिव्यांगांना आरएसईटीआय प्रशिक्षण देऊन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अर्थसाहाय्य जमा केले जाईल, अशी ग्वाही ५ मार्च २०२० रोजी समाजकल्याण अधिकाऱ्यांनी दिली होती. परंतु अद्याप ही रक्कम जमा झालेली नाही. २२ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाल्याने अर्थसाहाय्य जमा झाले नसावे, असे वाटले होते. परंतु यासंदर्भात मनपा अधिकाºयांशी संपर्क साधला असता, आता टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप मनोज बारापात्रे, सुशील बोटकेवार यांच्यासह पात्र उमेदवारांनी केला आहे. दिव्यांगांना योजनेचा लाभ न मिळाल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.