डॉक्टर बनविण्याचे स्वप्न दाखवून फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 12:20 AM2019-03-08T00:20:24+5:302019-03-08T00:21:03+5:30
मुलाला डॉक्टर बनविण्याचे स्वप्न दाखवून बंगळुरूमधील आरोपीने नागपुरातील एका पित्याला ४० हजारांचा गंडा घातला. आरोपीचा संशय आल्याने वेळीच तक्रार केल्यामुळे पुढे रक्कम लाटण्याचे प्रयत्न करणाऱ्या आरोपीचा डाव फसला. जुलै ते सप्टेंबर २०१८ दरम्यान घडलेल्या या बनवाबनवी प्रकरणात सदर पोलिसांनी आज सहा महिन्यानंतर गुन्हा दाखल केला. या प्रकरणातील तक्रारकर्ते स्वत: डॉक्टर आहेत, हे विशेष!
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुलाला डॉक्टर बनविण्याचे स्वप्न दाखवून बंगळुरूमधील आरोपीने नागपुरातील एका पित्याला ४० हजारांचा गंडा घातला. आरोपीचा संशय आल्याने वेळीच तक्रार केल्यामुळे पुढे रक्कम लाटण्याचे प्रयत्न करणाऱ्या आरोपीचा डाव फसला. जुलै ते सप्टेंबर २०१८ दरम्यान घडलेल्या या बनवाबनवी प्रकरणात सदर पोलिसांनी आज सहा महिन्यानंतर गुन्हा दाखल केला. या प्रकरणातील तक्रारकर्ते स्वत: डॉक्टर आहेत, हे विशेष!
डॉ. संजय नायडे हे सदरमधील मोहननगरात राहतात. त्यांना साहिल नामक मुलगा आहे. त्याला डॉक्टर बनविण्याचे नायडे यांचे प्रयत्न आहे. त्यासाठी ते जून-जुलै २०१८ मध्ये एमबीबीएस अॅडमिशनची ऑनलाईन माहिती घेत होते. १ जुलैला त्यांना ०७२२३२३४७० वरून फोन आला. स्वत:चे नाव विवेक राज सांगणाऱ्या आरोपीने साहिलची अॅडमिशन करून देण्याची हमी दिली. त्यासाठी त्याने एक अकाऊंट नंबर देऊन त्यात ४० हजार रुपये जमा करायला सांगितले. आरोपीकडून मिळत असलेली माहिती लक्षात घेता, त्याला एमबीबीएस प्रवेशप्रक्रियेची सविस्तर माहिती असल्याचे लक्षात आल्याने डॉ. नायडे यांनी आरोपीच्या खात्यात ४० हजार रुपये जमा केले. ही रक्कम जमा केल्यानंतर आरोपीने पुन्हा नवनवे कारण सांगून रक्कम जमा करायला सांगितले. ५ सप्टेंबर २०१८ पर्यंत आरोपी वारंवार फोन, मेसेज करीत असल्यामुळे डॉ. नायडे यांना संशय आला. त्यांनी लगेच सायबर शाखेत जाऊन या प्रकरणाची माहिती दिली. आरोपीने ज्या क्रमांकावरून डॉ. नायडेंशी संपर्क केला तो क्रमांक बेंगळुरू आणि त्याने दिलेला बँक खात्याचा क्रमांकही बेंगळुरू येथीलच एसबीआयचा असल्याचे स्पष्ट झाले. सायबर शाखेच्या अधिकाऱ्यांनी लगेच ते खाते फ्रीज करून नायडे यांची रक्कम सुरक्षित केली तर, आरोपीसोबत संपर्क केला असता, त्याने प्रतिसाद देणे बंद केले. त्यामुळे नंतर सायबर शाखेने हे प्रकरण सदर पोलिसांकडे सोपविले. पीएसआय विनोद म्हात्रे यांनी या प्रकरणात गुरुवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
टोळी सक्रिय!
मुलांना डॉक्टर बनविण्याचे स्वप्न दाखवून पालकांना लाखोंचा गंडा घालणारी टोळी अनेक वर्षांपासून सक्रिय आहे. लोकमतने या टोळीचा गेल्या वर्षी भंडाफोड केल्यानंतर सीताबर्डीत गुन्हाही दाखल झाला होता. फसगत झालेल्या पालकांनीच या प्रकरणात उदासीन भूमिका स्वीकारल्यामुळे आरोपींचे फावले.