बनवाबनवी : नागपुरात चार कोटीच्या बदल्यात पाच कोटीचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 07:31 PM2019-01-18T19:31:05+5:302019-01-18T19:41:04+5:30

चार कोटींच्या बदल्यात हातोहात पाच कोटी रुपये देण्याचे आमिष दाखवून व्यावसायिकांना लुटणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा येथील एका व्यावसायिकाच्या सतर्कतेमुळे छडा लागला. ठिकठिकाणच्या व्यापारी, उद्योजकांना लुटणाऱ्या या टोळीत नागपुरातील गँगस्टर संतोष आंबेकर (रा. इतवारी, लकडगंज) हा देखील सहभागी असल्याची खळबळजनक माहिती उघड झाली.

Cheating in Nagpur : Rs five crore instead of four crore rupees | बनवाबनवी : नागपुरात चार कोटीच्या बदल्यात पाच कोटीचा डाव

बनवाबनवी : नागपुरात चार कोटीच्या बदल्यात पाच कोटीचा डाव

Next
ठळक मुद्देव्यापाऱ्याच्या सतर्कतेमुळे उधळला डावआंतरराज्यीय टोळीचा छडागँगस्टर संतोष आंबेकरचा सहभागतिघांना अटक, साथीदार फरार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चार कोटींच्या बदल्यात हातोहात पाच कोटी रुपये देण्याचे आमिष दाखवून व्यावसायिकांना लुटणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा येथील एका व्यावसायिकाच्या सतर्कतेमुळे छडा लागला. ठिकठिकाणच्या व्यापारी, उद्योजकांना लुटणाऱ्या या टोळीत नागपुरातील गँगस्टर संतोष आंबेकर (रा. इतवारी, लकडगंज) हा देखील सहभागी असल्याची खळबळजनक माहिती उघड झाली असून, पोलिसांनी याप्रकरणी आंबेकरसह मनोज लीलाधर वाणी (वय ३७, रा. श्रीकृष्ण मंदिरामागे जळगाव), ज्ञानेश्वर बाबुराव सिंगर (वय ५०, रा. मोजाळ, कोपरगाव, ता. जळगाव), संजय सीताराम कुकर (वय ५३, येवला, जि. नाशिक), प्रशांत मस्के (वय ४०, रा. नंदनवन), शिंगाडे (शिर्डी) आणि त्याचा एक साथीदार या आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.
या बनवाबनवीची सुरुवात १२ जानेवारीच्या दुपारी २ वाजता झाली. रेशीमबागमधील व्यावसायिक रवींद्र प्रभाकर भोयर (वय ५२) यांच्या घरी आरोपी प्रशांत मस्के आणि मनोज लीलाधर वाणी आला. मला कुणी चार कोटी रुपये देत असेल तर मी हातोहात पाच कोटी रुपये परत देतो. तुम्ही मला रोकड देण्यापूर्वी माझ्याजवळ रोकड आहे की नाही, ते बघा नंतरच मला रक्कम द्या, अशी हमीही त्याने दिली. ही बोलणी झाल्यानंतर आरोपी मस्के आणि वाणी निघून गेले. १४ जानेवारीला आरोपी वाणीचा भोयर यांना फोन आला. १६ जानेवारीला मस्के पाच कोटी रुपये घेऊन येत आहे. तुमचे ज्या कुणासोबत बोलणे झाले असेल त्याची रोकड तयार ठेवा, असे तो म्हणाला. एक दिवसापूर्वीच माझ्यासमोर अशा प्रकारचा ३० कोटींचा व्यवहार पूर्ण झाला, अशी थाप मारून आपण हा व्यवहार करण्यास हरकत नाही, असे आरोपी म्हणाला. त्यानंतर १६ जानेवारीच्या सकाळी ११ वाजता मस्के आणि वाणी पुन्हा भोयरच्या घरी आले. आज सायंकाळी आपण चार कोटीच्या बदल्यात पाच कोटी देण्याचा व्यवहार करू, असे म्हणून आरोपी निघून गेले. त्यांचे बोलणे वागणे संशयास्पद वाटल्यामुळे भोयर यांना संशय आला. त्यामुळे भोयरने त्यांना १७ जानेवारीला दुपारी ३ वाजता गणेशपेठमधील जगदीश सावजी भोजनालयात बोलविले. त्यानुसार, मस्के, वाणी तसेच त्यांच्यासोबत शिंगाडे आणि आणखी एक साथीदार होता. शिंगाडे शिर्डी येथे राहत असल्याचे वाणीने यावेळी भोयर यांना सांगितले. त्या चारही जणांची देहबोली आणि परस्परविरोधी बोलण्यावरून भोयर यांना आरोपी बनवाबनवी करीत असल्याचा संशय आला.
अन् डील फिसकटली !
चार कोटींची डील असल्यामुळे भोयर यांनी सर्वांना बारीकसारीक विचारणा केली. गुरुवारी दुपारी भोजनालयात झालेल्या या बैठकीत आरोपी मस्के म्हणाला की शिंगाडे आपल्याला सांगतो त्यानुसार आपण काम करतो. तुम्ही आधी चार कोटी रुपये सोबत घ्या, नंतर शिंगाडे आणि त्याचा एक साथीदार आपल्याला पाच कोटी रुपये देतील. शिंगाडेला विचारणा करताच तो म्हणाला की, आपल्याला पाच कोटी रुपये संतोष आंबेकर देणार आहे. आपण त्याला भेटून आलो. त्याची डील पक्की आहे. कुख्यात आंबेकरचे नाव ऐकताच भोयर यांना धक्का बसला. हे सर्व जण मिळून आपली फसवणूक करण्याचा कट करीत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे भोयर यांनी सरळ गणेशपेठ ठाण्यात फोन करून या बनवाबनवीची माहिती दिली.
ठिकठिकाणी अनेकांना गंडा
कुख्यात संतोषचे नाव येताच पोलिसांनी सावधगिरीचा पवित्रा घेत या प्रकरणात गुन्हा नोंदवून घेतला. त्यानंतर सापळा रचून आरोपी मस्के, ज्ञानेश्वर सिंगर आणि संजय कुकर या तिघांना अटक केली. अन्य आरोपी पळून गेले. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या टोळीने ठिकठिकाणच्या व्यापारी, उद्योजकांना अशा प्रकारे कोट्यवधींचा गंडा घातला असावा, असा संशय आहे.

 

 

 

Web Title: Cheating in Nagpur : Rs five crore instead of four crore rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.