गॅस एजन्सी देण्याच्या नावाखाली नागपुरात फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 11:18 AM2019-07-15T11:18:47+5:302019-07-15T11:21:01+5:30
नागपुरात गॅस कंपनीची बनावट वेबसाईट तयार करून आणि त्यावर कंपनीचा ट्रेड मार्क वापरून सायबर टोळीने अनेकांची गॅस एजन्सी देण्याच्या नावाखाली फसवणूक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गॅस कंपनीची बनावट वेबसाईट तयार करून आणि त्यावर कंपनीचा ट्रेड मार्क वापरून सायबर टोळीने अनेकांची गॅस एजन्सी देण्याच्या नावाखाली फसवणूक केली. ही धक्कादायक बाब उघड झाल्यानंतर कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया लिमिटेडतर्फे पोलिसांकडे तक्रार नोंदविण्यात आली. या प्रकरणी शनिवारी सायबर टोळीविरुध्द सीताबर्डी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया लिमिटेडतर्फे गो गॅसचे उत्पादन केले जाते. कंपनीतर्फे ठिकठिकाणी वितरक नियुक्त करण्यात आले आहे. डिसेंबर २०१८ पासून कंपनीची बनावट वेबसाईट तयार करून त्यावर कंपनीचा ट्रेड मार्क वापरून ठिकठिकाणी गॅस एजन्सी देणे आहे, अशी जाहिरात केली जात आहे. त्या जाहिरातीवर विश्वास ठेवून अनेकांनी गॅस एजन्सी मिळवण्यासाठी प्रयत्न चालविले. संपर्क करणाऱ्यांसोबत सायबर टोळीतील आरोपी मेल तसेच मोबाईलच्या माध्यमातून संपर्क करून गॅस एजन्सी देण्याच्या बदल्यात सुरक्षा ठेव आणि अन्य कारणे सांगून रक्कम मागत होते. कंपनीचा ट्रेड मार्क आणि वेबसाईट बघून गॅस एजन्सी घेण्यास इच्छूक असणाऱ्यांना प्रथमदर्शनी कसलाही संशय येत नसल्याने अनेकांनी सायबर टोळीकडे संपर्क साधला. गॅस एजन्सी देण्याघेण्यासाठी अनेक शासकीय विभागाची परवानगी आवश्यक असते. सायबर टोळीने त्या बनावट परवानगी आणि ना हरकत प्रमाणपत्राची प्रतही तयार करून ठेवल्याने अनेकांचा त्यावर विश्वास बसला. त्यामुळे मेटल सिलेंडर आणि गो गॅस एलिट (कम्पोजिट सिलेंडर)ची एजन्सी मिळवण्यासाठी अनेकांनी टोळीतील सदस्यांना मोठी रक्कम दिली. टोळीतील सदस्यांकडून वारंवार रक्कम मागितली जात असल्याने काहींना संशय आला. त्यामुळे रक्कम जमा करणाऱ्यांनी गो गॅसच्या स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यामुळे या टोळीचे बिंग फुटले. कंपनीची बनावट वेबसाईट, ट्रेड मार्कच नव्हे तर बनावट शासकीय कागदपत्रांचा वापर करून सायबर टोळी अनेकांना गंडा घालत असल्याचे स्पष्ट झाल्याने कंपनीतर्फे अभिजित ईश्वर बोंडे (वय २८, रा. शिवणगाव) यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांनी हे प्रकरण सायबर सेलकडे तपासासाठी दिले. आरोपी डिसेंबर २०१८ पासून ही बनवाबनवी करीत असल्याचे स्पष्ट झाल्याने सायबर सेलकडून सीताबर्डी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दिल्ली-नोएडात टोळी सक्रिय
तंत्रज्ञानाचा गैरवापर करून विविध कंपन्या, उद्योजक, व्यावसायिक तसेच सर्वसामान्य नागरिकांना फसवून त्यांची रक्कम ऑनलाईन हडप करणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या अनेक टोळ्या दिल्ली, नोएडात सक्रिय आहेत. या टोळ्या केवळ खासगीच नव्हे तर शासकीय यंत्रणांच्याही बनावट वेबसाईट तयार करतात. त्यांनी गो गॅस सारख्याच अनेक कंपन्यांची एजन्सी देण्याच्या नावाखाली अनेकांना गंडविले असावे, असा संशय आहे. पोलिसांनी या टोळीचा छडा लावण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत.