नागपुरात नोकरी लावून देण्याच्या नावाखाली फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 12:27 AM2019-01-04T00:27:56+5:302019-01-04T00:28:46+5:30
नोकरी लावून देण्याची बतावणी करून तिघांकडून दोन आरोपींनी पावणेचार लाख रुपये हडपले. त्यांना वीज मंडळात नियुक्तीपत्रही दिले. ते बनावट असल्याचे ध्यानात आल्याने पीडितांनी पोलिसांकडे तक्रार केली. त्यावरून बुधवारी मानकापूर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नोकरी लावून देण्याची बतावणी करून तिघांकडून दोन आरोपींनी पावणेचार लाख रुपये हडपले. त्यांना वीज मंडळात नियुक्तीपत्रही दिले. ते बनावट असल्याचे ध्यानात आल्याने पीडितांनी पोलिसांकडे तक्रार केली. त्यावरून बुधवारी मानकापूर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
ईश्वर तिमाजी पेठउईके (वय ३५) आणि संदीप गोमाजी मेश्राम (वय २८) अशी आरोपींची नावे आहेत. ते पारशिवनी तालुक्यातील सावली येथील रहिवासी होय.
कोराडी मार्गावरील श्रीनगरमध्ये राहणारे आशिष अरविंदसिंग ठाकूर (वय २४) आणि त्यांच्या दोन मित्रांना आरोपी पेठउईके आणि मेश्रामने दोन वर्षांपूर्वी वीज मंडळात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. त्यांच्याकडून शैक्षणिक कागदपत्रे आणि ३ लाख ७५ हजार रुपये घेतले. १५, जुलै २०१७ ला त्यांना वीज मंडळात नोकरीचे नियुक्तीपत्र दिले. हे नियुक्तीपत्र घेऊन ठाकूर तसेच त्याचे मित्र वीज मंडळाच्या कार्यालयात गेले असता ते नियुक्तीपत्र बनावट असल्याचे त्यांना कळले. आपली फसगत झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी आरोपी पेठउईके आणि मेश्रामला आपली रक्कम परत मागितली. आरोपींनी बरेच दिवस टाळाटाळ केल्यानंतर रक्कम परत करण्यास नकार दिला. त्यामुळे ठाकूर आणि त्याच्या मित्रांनी मानकापूर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपी पेठउईके आणि मेश्रामविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.
अनेकांची फसवणूक
महावितरणमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून कोराडी, मानकापूर आणि नागपूरच्या आजूबाजूला राहणाऱ्या काही दलालांनी अनेक तरुणांकडून लाखो रुपये हडपले आहे. तीन महिन्यांपूर्वी या प्रकरणाचा बोभाटाही झाला होता. मात्र, पोलिसांनी या प्रकरणात आरोपींची चौकशी सुरू असल्याचे सांगून हे प्रकरण पद्धतशीरपणे थंड केले.