नागपुरात लकी ड्रॉच्या नावाखाली फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 01:50 PM2019-05-16T13:50:19+5:302019-05-16T13:51:40+5:30
लकी ड्रॉच्या नावाखाली शेकडो लोकांकडून रक्कम गोळा करून दोन भामट्यांनी शहरातून पळ काढला. काही दिवसांपासून या भामट्यांचे दुकान बंद आणि ते बेपत्ता झाल्याचे लक्षात आल्याने गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लकी ड्रॉच्या नावाखाली शेकडो लोकांकडून रक्कम गोळा करून दोन भामट्यांनी शहरातून पळ काढला. काही दिवसांपासून या भामट्यांचे दुकान बंद आणि ते बेपत्ता झाल्याचे लक्षात आल्याने गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. बुधवारी गुंतवणूकदारांनी केलेल्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला.
ज्ञानेश्वर नानाभाऊ मेटांग याने महालक्ष्मी लकी ड्रॉच्या नावाने गिट्टीखदान परिसरात अडीच वर्षांपूर्वी फसवणुकीचा गोरखधंदा सुरू केला. लकी ड्रॉच्या नावाखाली छोेटे दुकानदार, सर्वसामान्य नागरिकांकडून दर महिन्याला तो विशिष्ट रक्कम जमा करत होता. ही रक्कम गोळा करण्याची जबाबदारी मेटांगने अभिषेक बुरबुरे यांच्यावर सोपविली होती. दर महिन्याच्या शेवटच्या तारखेला लकी ड्रॉ काढला जात होता. ती रक्कम संबंधित व्यक्तीला दिली जात होती. अनेक महिन्यांपासून लकी ड्रॉचा प्रकार सुरळीत सुरू असल्याने रक्कम गुंतविणारांची संख्या वाढत होती. गेल्या काही दिवसांपासून मात्र आरोपी मेटांग एकाएकी बेपत्ता झाला. त्याच्या पाठोपाठ बुरबुरेही गायब झाला. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये कुजबुज सुरू झाली. लकी ड्रॉची तारीख निघून गेली तरी आरोपी मेटांग किंवा बुरबुरे त्यांच्या कार्यालयात दिसत नसल्याने गुंतवणूकदारांमध्ये खळबळ निर्माण झाली. वारंवार संपर्क करूनही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून अखेर गुंतवणूकदारांनी गिट्टीखदान ठाण्यात धाव घेतली. ठाणेदार सतीश गुरव यांनी बुधवारी या प्रकरणी रामलाल बालराम कनोजिया (वय ५९, रा. अनंत नगर) यांच्या तक्रारीवरून मेटांग तसेच बुरबुरेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करून घेतला.
सारेच गोलमाल
पोलिसांच्या माहितीनुसार, मेटांग या बनवाबनवीचा मुख्य सूत्रधार आहे. तो महिनाभरापासून बेपत्ता असून, तशी तक्रारही (मिसिंग) गिट्टीखदान ठाण्यात दाखल आहे. त्याने लकी ड्रॉ सुरू करताना शासनाची कसलीही परवानगी घेतली नव्हती. प्राथमिक चौकशीनुसार, आरोपींनी ९२ लाख, ३३ हजार, ५०० रुपये हडपल्याची माहिती पुढे आली आहे. हा आकडा वाढू शकतो. पोलीस मेटांग आणि बुरबुरेचा शोध घेत आहेत.