सदनिकेचा ताबा देण्याची बतावणी करून फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 11:53 PM2018-06-16T23:53:19+5:302018-06-16T23:53:19+5:30
सदनिकेचे अर्धवट बांधकाम पूर्ण करून ताबा मिळवून देण्याची बतावणी करून फसवणूक करणाऱ्या धनंजय धोंडारकर (रा. अवतार मेहेरबाबा सोसायटी, बोले पेट्रोल पंपाजवळ) नामक व्यक्तीविरुद्ध सीताबर्डी पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल केला. धोंडारकर वकील असल्याचे पोलीस सांगतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सदनिकेचे अर्धवट बांधकाम पूर्ण करून ताबा मिळवून देण्याची बतावणी करून फसवणूक करणाऱ्या धनंजय धोंडारकर (रा. अवतार मेहेरबाबा सोसायटी, बोले पेट्रोल पंपाजवळ) नामक व्यक्तीविरुद्ध सीताबर्डी पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल केला. धोंडारकर वकील असल्याचे पोलीस सांगतात.
लक्ष्मीनगरातील रहिवासी अनिल देवराव मालन यांच्या तक्रारीनुसार, त्यांनी काही वर्षांपूर्वी संचयनीनगरीत एक सदनिका घेतली होती. बिल्डरकडून नमूद मुदतीत बांधकाम व ताबा न मिळाल्याने हे प्रकरण कोर्टात गेले. दरम्यान, मालन यांची धोंडारकरसोबत ओळख झाली. यावेळी धोंडारकर यांनी हे अर्धवट बांधकाम सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली मोरया अॅग्रो प्लॅन्टेशन पूर्ण करून देणार आहे, असे सांगितले. त्यानंतर सदनिकेचा ताबा मालन यांना देण्याचे आमिष दाखवून १ लाख ८८ हजार ५०० रुपयांचे दोन धनादेश २९ आॅगस्ट २०११ ला मालन यांच्याकडून घेतले. विशेष म्हणजे, मोरया अॅग्रो प्रा. लि.चे मालक प्रफुल्ल वैद्य आणि त्यांची पत्नी वर्षा यांचा या प्रकरणात काहीएक संबंध नसताना धोंडारकर यांनी स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी एक संयूक्त बँक खाते उघडून त्यात रक्कम जमा केली. त्यानंतर वारंवार पैशाची मागणी करूनही धोंडारकर यांनी मालन यांना रक्कम परत केली नाही. त्यामुळे मालन यांनी सीताबर्डी ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी चौकशी करून धोंडारकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.