बँकेत नोकरीचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 11:49 PM2020-09-08T23:49:44+5:302020-09-08T23:51:22+5:30
आधी लिपिक आणि नंतर उपव्यवस्थापक म्हणून नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून एका आरोपीने तरुणीचे एक लाख रुपये हडपले. विशेष म्हणजे, तिच्या माध्यमातून दुसऱ्याचीही त्याने फसवणूक केली. मात्र फसगत झालेल्या तरुणीवरच अंबाझरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आधी लिपिक आणि नंतर उपव्यवस्थापक म्हणून नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून एका आरोपीने तरुणीचे एक लाख रुपये हडपले. विशेष म्हणजे, तिच्या माध्यमातून दुसऱ्याचीही त्याने फसवणूक केली. मात्र फसगत झालेल्या तरुणीवरच अंबाझरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अश्विनी गुलाबराव ठवळे (वय २४) असे पीडित तरुणीचे नाव आहे. ती वर्धा जिल्ह्यातील काजळी (ता. कारंजा घाडगे) येथील रहिवासी आहे.
आज तिने पोलीस आयुक्त कार्यालयात दिलेल्या तक्रारीनुसार, वर्धा येथील सहयोग नगरातील रहिवासी असलेल्या आरोपी पंकज जयस्वाल याने तुला माझ्या बँकेत ३५ हजार रु. महिन्याची नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवले. त्या बदल्यात आरोपी जयस्वालने अश्विनीकडून एक लाख रुपये घेतले. नंतर त्या जागा भरल्या आता पुन्हा उपव्यवस्थापक पदासाठी जागा निघाल्या, असे सांगून २० मार्च २०१८ ला तिला एक लाख पंचवीस हजार रुपये पगाराचे नियुक्तीपत्र दिले. बँकेत गेल्यानंतर ते नियुक्तीपत्र बनावट असल्याचे उघड झाले. त्यामुळे अश्विनीने ७ मार्च २०१९ ला कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यानंतर कारंजा (जि. वर्धा) पोलीस ठाण्यातही तक्रार नोंदविली. मात्र त्यावर कारवाई झाली नाही. दरम्यान आरोपीने अश्विनीच्या माध्यमातून प्रतिभा नामक तरुणीकडूनही नोकरीच्या नावाखाली रक्कम घेतली. दोन वर्ष होऊनही नोकरी न मिळाल्याने प्रतिभाने अश्विनीविरुद्ध अंबाझरी ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी अश्विनीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आपली रक्कम गेली आणि फसवणूक झाली. शिवाय आपल्याचविरुद्ध फसवणुकीचा गुन्हाही दाखल झाल्यामुळे अश्विनी हादरली आहे.
पोलीस आयुक्तालयात धाव
गुन्हा दाखल झाल्यापासून आपल्या जवळचे कागदपत्र घेऊन अश्विनी
न्यायासाठी इकडे तिकडे फिरत आहे. तिने संबंधित पोलीस ठाण्यात जाऊन आपली बाजूही मांडली आहे. दाद मिळत नसल्याचे पाहून तिने आज पोलीस आयुक्तांकडे तक्रार नोंदवून न्यायाची अपेक्षा व्यक्त केली.