प्रजासत्ताक दिन मुंबईतील परेडसाठी चेचेनाथची निवड ; डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयातील विद्यार्थी
By आनंद डेकाटे | Published: January 13, 2024 02:27 PM2024-01-13T14:27:25+5:302024-01-13T14:27:34+5:30
राष्ट्रीय सेवा योजनाच्या वतीने पथसंचलनाचे आयोजन केले जाते.
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाचा विद्यार्थी चेचेनाथ भोपी पवार याची प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबई येथील राज्यस्तरीय पथ संचलनासाठी निवड झाली आहे. राष्ट्रीय सेवा योजनाच्या वतीने पथसंचलनाचे आयोजन केले जाते.
मुंबई येथील प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने विद्यापीठ स्तरावर निवड स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून आठ विद्यार्थ्यांची सोलापूर येथे आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. सोलापूर येथे संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यापीठातून स्पर्धेसाठी विद्यार्थी आले होते.
सोलापूर येथील राज्यस्तरीय चाचणीतून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाचा विद्यार्थी चेचेनाथ गोपी पवार याची मुंबई येथील पथसंचलनासाठी निवड झाली आहे. या खडतर आणि कठीण स्पर्धेमध्ये चेचेनाथ पवार यांनी उल्लेखनीय यश मिळविले. त्यांच्या या कामगिरीमुळे विद्यापीठाचे व विधी महाविद्यालयाचे नाव गौरान्वित झाले. त्यांच्या या यशासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवीशंकर मोर, डॉ. प्रवीणा खोब्रागडे, राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. अधरा देशपांडे यांनी अभिनंदन केले.