धान्य विक्रीचे ‘चेक बाऊन्स’
By Admin | Published: April 17, 2017 02:14 AM2017-04-17T02:14:45+5:302017-04-17T02:14:45+5:30
नोटाबंदीच्या काळात स्थानिक व परिसरातील काही शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील धान्य व्यापाऱ्याला विकले.
व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल : पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
महादुला (रामटेक) : नोटाबंदीच्या काळात स्थानिक व परिसरातील काही शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील धान्य व्यापाऱ्याला विकले. व्यापाऱ्याने शेतकऱ्यांना रोख रकमेऐवजी ‘चेक’ दिले. शेतकऱ्यांनी सदर ‘चेक’ त्यांच्या बँकखात्यात जमा केले असता, ते ‘बाऊन्स’ झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी या व्यापाऱ्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली.
रामटेक पोलिसांनी ‘त्या’ व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असला तरी त्याला अटक केली नाही. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासात मुद्दाम दिरंगाई करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
प्रफुल्ल धापले, रा. रामटेक असे व्यापाऱ्याचे नाव आहे. तो मागील काही वर्षांपासून रामटेक, मौदा व पारशिवनी तालुक्यातील शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करण्याचा व्यवसाय करतो.
त्याने नोटाबंदीच्या काळाला रामटेक तालुक्यातील महादुला, पंचाळा, मौदा तालुक्यातील मौदा, निमखेडा, पारडी (कला), चाचेर, तारसा, रेवराळ येथील काही शेतकऱ्यांकडून धानासह अन्य धानाची खरेदी केली.
व्यापाऱ्याकडे पुरेसी रोख रक्कम नसल्याने त्याने या शेतकऱ्यांना आठ दिवस ते तीन महिने मुदतीचे (पोस्ट डेटेड) ‘चेक’ दिले. शेतकऱ्यांनी सदर ‘चेक’ त्यांच्या बँक खात्यात जमा केले. नियोजित काळात चेक न वटल्याने अनेकांनी बँक कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली असता, ‘चेक बाऊन्स’ झाल्याचे त्यांना सांगण्यात आले.
शेतकऱ्यांनी या प्रकाराची माहिती लगेच व्यापाऱ्याला दिली. परंतु, त्याने त्याच्या बँक खात्यात पुरेशा रकमेचा भरणा केला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेवटी रामटेक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.
या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी व्यापाऱ्याविरुद्ध भादंवि ४२० अन्वये गुन्हा नोंदविला. परंतु, त्याला अद्यापही अटक करण्यात न आल्याने तसेच तपासात दिरंगाई केली जात असल्याने शेतकऱ्यांनी रामटेक पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
प्रशासनाने व्यापाऱ्यास अटक करावी तसेच धान्य विक्रीची रक्कम शेतकऱ्यांना त्वरित मिळवून द्यावी, अशी मागणी भागवत काठोके, सुरेश काठोके, माणिक मोहने, जितेंद्र मोहने, भारत तरारे, सुनील काठोके, इंद्रपाल मोहने, सुनील बरबटे, गुणवंत सोनवणे, देवचंद काठोके, नरेश काठोके यांनी केली आहे. (वार्ताहर)