मुलाच्या हत्येचा सीआयडी तपास करा
By admin | Published: March 8, 2017 02:41 AM2017-03-08T02:41:09+5:302017-03-08T02:41:09+5:30
मुलाच्या हत्येचा सीआयडीमार्फत तपास व्हावा यासाठी पीडित वडीलाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर
वडिलांची हायकोर्टाला विनंती : गृह विभागाच्या सचिवांना नोटीस
नागपूर : मुलाच्या हत्येचा सीआयडीमार्फत तपास व्हावा यासाठी पीडित वडीलाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व इंदिरा जैन यांनी मंगळवारी याचिकेवर सुनावणी केल्यानंतर, गृह विभागाचे सचिव व अन्य प्रतिवादींना नोटीस बजावून दोन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.
त्र्यंबक डोंगरदिवे असे बापाचे नाव असून ते निंबा, ता. भातकुली, जि. अमरावती येथील रहिवासी आहेत. त्यांच्या मुलाचे नाव प्रफुल्ल होते. प्रफुल्ल इयत्ता १२ वीचा विद्यार्थी व दलित पँथर संघटनेचा तालुकाध्यक्ष होता. तो अवैध दारू विक्रीच्या व्यवसायात गुंतलेला होता. १६ आॅक्टोबर २०१६ रोजी तो मित्र प्रदीप मोहोडसोबत मोटरसायकलने कुरुम गावाकडे जात होता. दरम्यान, पोलीस कॉन्स्टेबलने त्यांना अडवले. त्यामुळे त्यांच्यात शाब्दिक चकमक सुरू झाली. त्यावेळी अवैध दारू विक्री करणाऱ्या अन्य गटातील लोकांनी प्रफुल्ल व प्रदीपवर काठ्या व लोखंडी रॉडने हल्ला केला. प्रदीप पळ काढण्यात यशस्वी ठरला तर, त्या लोकांनी प्रफुल्लला जागेवरच ठार केले. माना पोलिसांच्या हद्दीत ही घटना घडली. प्रदीपने पोलीस ठाण्यात तक्रार दिली असता त्याची दखल घेण्यात आली नाही. दुसऱ्या दिवशी प्रफुल्लचा मृतदेह रेल्वे रुळावर कटलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याच्या हत्येला अपघाताचे स्वरूप देण्यात आले, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. प्रदीप वाठोरे यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)