भाषांचे व्याकरण जपा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 12:33 AM2017-09-15T00:33:14+5:302017-09-15T00:33:31+5:30
तंत्रज्ञानाच्या युगात भाषेच्या वापराची पद्धतदेखील झपाट्याने बदलत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तंत्रज्ञानाच्या युगात भाषेच्या वापराची पद्धतदेखील झपाट्याने बदलत आहे. भाषेचे शब्द लहान करुन वापरण्यावर भर असून ‘कोड’ भाषेकडे मार्गक्रमण सुरू आहे. मात्र कुठल्याही भाषेचा गाभा हा त्याचे व्याकरण असते. त्यामुळे व्याकरण जपण्यासाठी विशेष प्रयत्नांची आवश्यकता आहे, असे मत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी केले.
विद्यापीठाच्या जनसंवाद विभागात हिंदी दिवसानिमित्त गुरुवारी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून ‘लोकमत समाचार’चे संपादक विकास मिश्र उपस्थित होते. विभागप्रमुख डॉ.धर्मेश धवनकर, डॉ.मोईज हक उपस्थित होते. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. येथे शेकडो भाषा बोलल्या जातात. मात्र यातील हिंदी ही एकमेव अशी भाषा आहे जी बहुतांश नागरिकांना समजते. हिंदी ही मने जोडणारी भाषा आहे. जेथे हिंदी बोलले जात नाही तेथेदेखील या भाषेच्या माध्यमातून संपर्क होऊ शकतो. राष्ट्रीय स्तरावरील भाषा असली तरी हिंदी ही राष्ट्रभाषा होऊ शकली नाही. हिंदीचा प्रचार-प्रसार होईल तेव्हाच हे होईल. विद्यार्थ्यांनी या भाषेचे महत्त्व लक्षात घेऊन याचे संवर्धन करायला हवे, असे डॉ.काणे म्हणाले. हिंदीचा प्रचार-प्रसार करण्यासाठी हिंदीची संस्कृती जाणून घेतली पाहिजे. हिंदी संकटात आहे असे साधारणत: लोक म्हणतात. मात्र प्रत्यक्षात लोकांची मान्यता असलेली भाषा असल्याने हिंदीची मागणी दिवसेंदिवस वाढते आहे, असे प्रतिपादन विकास मिश्र यांनी केले. प्रास्ताविक डॉ.धर्मेश धवनकर यांनी केले. तत्पूर्वी विभागातील शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. रिंतू त्रिपाठी यांनी संचालन केले तर सारंग कापगते यांनी आभार मानले.