भूमाफियांची कुंडली तपासणार

By admin | Published: May 17, 2017 01:52 AM2017-05-17T01:52:49+5:302017-05-17T01:52:49+5:30

कुख्यात भूमाफिया दिलीप ग्वालबन्सी आणि त्याच्या टोळीतील गुंडांभोवती भक्कम कारवाईचा फास

Check the horoscope horoscope | भूमाफियांची कुंडली तपासणार

भूमाफियांची कुंडली तपासणार

Next

एसआयटीची व्याप्ती ग्वालबन्सी प्रकरणापुरती मर्यादित नाही
नरेश डोंगरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कुख्यात भूमाफिया दिलीप ग्वालबन्सी आणि त्याच्या टोळीतील गुंडांभोवती भक्कम कारवाईचा फास आवळण्याच्या निमित्ताने निर्माण करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाची (एसआयटी) व्याप्ती केवळ ग्वालबन्सी प्रकरणापुरतीच मर्यादित नाही. ग्वालबन्सी, त्याचे गुन्हेगार नातेवाईक, ग्वालबन्सी टोळीतील गुंड आणि त्यांच्याप्रमाणेच सर्वसामान्य नागरिकांच्या जमिनी हडपणाऱ्या भूमाफियांचीही कुंडली एसआयटी तयार करीत आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी मंगळवारी लोकमतशी बोलताना दिली.
शेकडो गोरगरीब नागरिक आणि सर्वसामान्य नोकरदारांसोबतच चक्क पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचीही जमीन हडपणाऱ्या भूमाफिया दिलीप ग्वालबन्सी, जगदीश ग्वालबन्सी, हरीश ग्वालबन्सी आणि त्याच्या नातेवाईकांसह गुंडांवरही पोलिसांनी कारवाईचा सपाटा लावला आहे. तब्बल तीन दशकांहून अधिक कालावधीपासून गिट्टीखदान, काटोल मार्ग, झिंगाबाई टाकळी, हजारी पहाड, सुरेंद्रगड, कोराडी, गोधनी आणि आजूबाजूच्या परिसरात ग्वालबन्सी टोळीने पैसा आणि दंडुकेशाहीच्या जोरावर अक्षरश: हैदोस घातला आहे. त्यांच्या गुंडगिरीसोबतच राजकीय संरक्षणाची जोड असल्याने पोलिसही त्यांच्यावर कारवाई करीत नव्हते. मात्र, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी आतापर्यंत भल्या भल्या पोलीस अधिकाऱ्यांनी जे केले नाही, ते करण्याचे धाडस दाखविले. केवळ गुन्हेच दाखल केले नाही तर ग्वालबन्सीला गजाआड करून त्याच्या साम्राज्यावर बुलडोझरही चालविला आहे. अनेक पीडितांना त्यांची जमीन परत करण्याचीही धडाकेबाज कारवाई पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वातील शहर पोलीस दलाने केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक नागपूर पोलिसांवर स्तुतिसुमने उधळत आहेत.
दुसरीकडे केवळ ग्वालबन्सीच नव्हे तर त्याच्यासारखे अनेक भूमाफिया आणि त्याची पिलावळ उपराजधानीत वळवळत असल्यामुळे या पिलावळीलाही ठेचले जावे, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक करीत आहे. इच्छा असूनही अनेक पीडित नागरिक विविध भागातील भूमाफियांविरुद्ध तक्रार करण्यासाठी पुढे येण्याची हिंमत दाखवत नाही. अशी या भूमाफियांची विविध भागात दहशत आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांशी लोकमतने विशेष बातचीत केली. ती पुढीलप्रमाणे आहे.

एसआयटीची निर्मिती केवळ ग्वालबन्सी प्रकरणापुरतीच आहे का?
पोलीस आयुक्त : नाही. अशाप्रकारचे जेवढे गुन्हे शहरात झाले आहेत किंवा जे जे पीडित तक्रार करीत आहेत त्या सर्वच प्रकरणाची चौकशी करून पोलीस कडक कारवाई करणार आहेत.
सर्वसामान्य नागरिक भूमाफियांच्या दहशतीमुळे तक्रार करण्यास घाबरतात.
पोलीस आयुक्त : अजिबात घाबरण्याचे कारण नाही. पीडित नागरिकांनी बिनधास्तपणे एसआयटीकडे तक्रारी कराव्या.
प्रत्येक तक्रारीची दखल घेतली जाईल का? पोलीस आयुक्त : हो, प्रत्येक तक्रारीची दखल घेतली जाईल. मात्र, तक्रार करणाऱ्यांनी बनवाबनवी करू नये. पुराव्यानिशी तक्रार करावी. उगाच कुणाला त्रास देण्याच्या हेतूने कुणाची खोटी तक्रार केल्याचे स्पष्ट झाल्यास खोटी तक्रार करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.
अनेकदा तक्रार करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांकडे पीडितांना तासन्तास बसावे लागते. त्यामुळे संबंधित तक्रारकर्त्यांनी थेट कुणाला भेटावे, त्यासाठी कुणी अधिकारी उपलब्ध होईल का? पोलीस आयुक्त : होय. नक्कीच उपलब्ध होतील. गुन्हेशाखेचे पोलीस आयुक्त संभाजी कदम किंवा सहायक पोलीस आयुक्त सोमनाथ वाघचौरे यांची थेट भेट घेऊन पीडित व्यक्ती तक्रार करू शकतात. या संबंधाने गुन्हेशाखेच्या (०७१२ : २५६६६०४ किंवा २५६५५७०) संपर्क नंबरवर पीडित व्यक्ती फोन करू शकतात.
भूमाफियांची दहशत कमी करण्यासाठी मोक्कासारखी कडक कारवाई करणार का ? पोलीस आयुक्त : भूमाफिया, गुंडांच्या टोळ्या यांची दहशत कमी करण्यासाठी पोलीस शक्य होईल तेवढी कडक आणि कायदेशीर कारवाई करणार आहेत. त्यासाठी नागपुरातील भूमाफिया आणि गुन्हेगारांची कुंडली तयार करण्यात आली आहे.

 

Web Title: Check the horoscope horoscope

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.